देशातील 112 आकांक्षित जिल्ह्यांमध्ये ‘सुरक्षित हम, सुरक्षित तुम’ अभियानाची सुरुवात

0
17

गोवा खबर : नीती आयोग आणि पिरामल फाउंडेशन यांनी आज देशाच्या 112 आकांक्षित जिल्ह्यांमध्ये ‘सुरक्षित हम, सुरक्षित तुम’ अभियानाची सुरुवात केली. कोरोनाची लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या कोविड-19 रुग्णांना त्यांच्या निवासस्थानी उपचार घेता यावे यासाठी आरोग्य सुविधा पुरविण्याकामी जिल्हा प्रशासनाला मदत करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.

‘आकांक्षित जिल्हे सहयोगत्व’ नामक विशेष उपक्रमाचा भाग असलेल्या या अभियानामध्ये सरकारच्या ‘आकांक्षित जिल्हे’ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या प्रमुख कार्यक्षेत्रात उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी स्थानिक नेते, नागरी समाज आणि स्वयंसेवक जिल्हा प्रशासनासोबत एकत्र येऊन काम करतात.

जिल्हाधिकारी आणि 1,000 हून अधिक स्थानिक स्वयंसेवी संस्था भागीदारीतून ‘सुरक्षित हम, सुरक्षित तुम’ अभियानाचे नेतृत्व करणार असून, ते कोविड रुग्णांकडून आलेल्या किंवा रुग्णांनी केलेल्या फोनच्या माध्यमातून त्या रुग्णांशी संवाद साधण्यासाठी 1 लाखांहून अधिक स्वयंसेवकांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्याची काम  करतील. स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात मदत करण्यासाठी पिरामल फाउंडेशन आणि जिल्हाधिकारी एकत्रितपणे काम करतील.

या अभियानाची सुरुवात करताना नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत म्हणाले की, “ ‘सुरक्षित हम, सुरक्षित तुम’ हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असून कोरोना संबंधी तातडीच्या गरजांना प्रतिसाद देण्यासाठी आणि कोविड-19 आजाराच्या खूप काळ जाणवणाऱ्या परिणामांवर उपाय शोधण्यासाठी आकांक्षित जिल्ह्यांतील भारताच्या अत्यंत गरीब समुदायांना तो दीर्घकालीन पाठबळ देईल.

हे अभियान निर्धारित प्रदेशांतील सुमारे 70% कोविड बाधित रुग्णांवर घरी उपचार करण्यासाठी योग्य व्यवस्थापनाबाबतच्या जिल्हा प्रशासनाच्या तयारीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल जेणेकरून आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल आणि लोकांमध्ये या आजाराची पसरलेली  भीती कमी होईल अशी अपेक्षा आहे. आकांक्षित जिल्ह्यांमध्ये पुरविण्यात आलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचा योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी नागरिकांच्या क्षमता बांधणीचे देखील काम या अभियानाद्वारे हाती घेतले जाईल.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारावर स्वयंसेवी संस्था कोविड बाधितांना त्यांच्या घरात आरोग्य सुविधा आणि उपचार पुरविण्यासाठी स्थानिक स्वयंसेवकांना प्रेरित करतील. या स्वयंसेवकांना, प्रत्येकी 20 बाधित कुटुंबांना मदत करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल, यामध्ये रुग्णाची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना कोविड योग्य नियम पाळण्याचे शिक्षण देणे, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबाला सामाजिक-मानसिक आधार देणे आणि रुग्णांच्या स्थितीबाबत प्रशासनाला वेळोवेळी अद्यतन माहिती देणे या कामांचा समावेश आहे.

‘पिरामल फाउंडेशन’च्या सेवा कार्याच्या मूल्याला अनुसरत, आम्ही 112 आकांक्षित जिल्ह्यांतील प्रत्येक कोविड रुग्णापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या कार्यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था, विविध समुदाय आणि इतर सर्व भागधारकांनी एकत्र येऊन ‘आकांक्षित जिल्हा सहयोगत्व’ उपक्रमासाठी त्यांच्या सेवा द्याव्या  असे आवाहन पिरामल ग्रुपचे अध्यक्ष अजय पिरामल यांनी केले.