देशातील कोविड रुग्णसंख्या 21,393

0
535

कोविड-19 संदर्भातील ताजी स्थिती

 

 

 

गोवा खबर:कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रित उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनांवर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.

कोविड-19 या संसर्गजन्य आजाराबाबतची सद्यस्थिती बघता, संसर्गजन्य आजार नियंत्रण कायदा,1897 मध्ये दुरुस्ती करणारा अध्यादेश जारी करण्यात आला आहे.

संसर्गजन्य आजार(कायदा) अध्यादेश असे नाव असलेल्या या अध्यादेशानुसार, “कोणत्याही व्यक्तीने आरोग्य सेवा कर्मचाऱ्याबाबत कुठलेही हिसंक कृत्य करु नये तसेच या आजाराच्या काळात, आरोग्य यंत्रणांमधील संपत्तीची नासधूस करु नये.”

अशा हिंसक कारवाया अथवा डॉक्टरांवरील हल्ले दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे ठरतील, अशी दुरुस्ती या कायद्यात करण्यात आली आहे. अशा हिंसक कारवाया करणारे किंवा त्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या गुन्हेगारांना तीन ते पाच वर्षापर्यंतची शिक्षा आणि 50 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंतचा दंड केला जाऊ शकतो. कर्मचाऱ्यांवर गंभीर हल्ला केला तर सहा महिन्यांपासून ते सात वर्षांपर्यंतची शिक्षा आणि 1 लाख रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड आकाराला जाऊ शकतो. त्याशिवाय, या प्रकरणी, हल्ला करणाऱ्याने रुग्णालयाचे आणि कर्मचाऱ्यांचे केलेले नुकसान भरुन देण्यासाठी, नुकसानीच्या रकमेच्या दुप्पट रक्कम द्यावी लागेल.(त्याबद्दलचा निर्णय न्यायालय घेईल)

आजच्या गणनेनुसार देशातील 12 जिल्ह्यांमध्ये गेल्या 28 दिवसांत कोविड-19 चा एकही रुग्ण आढळलेला नाही. 21 एप्रिल 2020 नंतर या यादीत आणखी आठ जिल्ह्यांची भर पडली आहे. हे जिल्हे आहेत—चित्रदुर्ग (कर्नाटक), बिलासपूर (छत्तीसगढ), इम्फाळ पश्चिम (मणिपूर) ऐजवाल पश्चिम (मिझोराम), भद्राद्री कोत्तागुंडम (तेलंगणा) पीलीभीत (उत्तरप्रदेश) SBS नगर (पंजाब) आणि दक्षिण गोवा (गोवा).

या शिवाय 78 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही.

आतापर्यंत देशभरात उपचारानंतर कोरोनाचे 4,257 रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर 19.89 टक्के इतका आहे. कालपासून, कोरोनाच्या रूग्णांमध्ये 1409 रुग्णांची भर पडली असून, देशातील एकूण रुग्णसंख्या 21,393 इतकी झाली आहे.

कोविड-19संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19@gov.in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019@gov.in.

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf.