देशाच्या प्रगतीत विज्ञान आणि समाज यातील संबंधांची भूमिका महत्त्वाची :नाईक

0
1209

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे उदघाटन

 गोवा खबर:केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेत भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या विज्ञान महोत्सवात सुमारे 1200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी शिक्षण विभागाच्या सचिव श्रीमती निला मोहनन, उत्तर गोवा जिल्हाधिकारी लेविन्सन मार्टीन्स आणि विज्ञान परिषदेचे राष्ट्रीय आयोजक जयंत सहस्त्रबुद्धे यांची उपस्थिती होती.

आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलताना नाईक म्हणाले की, देशाच्या प्रगतीत विज्ञान आणि समाज यातील संबंधांची भूमिका महत्त्वाची ठरते. गेल्या चार वर्षांत भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाने विविध उपक्रमांतर्गत विज्ञानाला सामान्य नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, उद्योजक यांच्याशी जोडले आहे. केंद्र सरकारच्या प्रमुख योजना स्वच्छ भारत अभियान, स्वस्थ भारत अभियान, मेक इन इंडिया, डिजीटल इंडिया, आदर्श ग्राम, स्मार्ट सिटी, नमामी गंगे, उन्नत भारत अभियान यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका महत्वाची आहे.

सध्या आपल्यासमोर नवनवीन आव्हाने निर्माण होत आहेत, त्याचा विज्ञान क्षेत्रात व्यापक विचार होण्याची आवश्यकता आहे, असे श्री नाईक म्हणाले. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राला सरकारचे पूर्ण सहकार्य आहे, नीती आयोगाने देशातील विज्ञान-तंत्रज्ञान धोरणासंदर्भात परिपूर्ण भूमिका घेतली असल्याचे ते म्हणाले. शाश्वत विकासासाठी विज्ञान-तंत्रज्ञान महत्वाचे आहे. शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकांनी लोकांच्या वाढत्या आकांक्षाची पूर्तता केली पाहिजे. तसेच रोजगारनिर्मितीचे धोरण समोर ठेवून ग्रामीण भागाकडे लक्ष दिले पाहिजे.

विज्ञान महोत्सावदरम्यान विद्यार्थ्यांना सागरी विज्ञान आणि तंत्रज्ञान, तसेच सागरी संशोधनातील घडामोडींविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना सागरी जीवन, सागरांचे रसायनशास्त्र, मरीन रोबोटस, सागरी प्रदूषण, सागर आणि हवामान, सागरी सर्वेक्षण या विषयांवर शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची तसेच या विषयावरील चित्रपट पाहण्याची संधी मिळाली.