गोवा खबर:कोणत्याही देशाची गती, प्रगती आणि विकास हा त्या देशाच्या नेतृत्वावर अवलंबून असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आज आपल्या देशाने जगात दबदबा निर्माण केला आहे. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार पारदर्शक आणि भ्रष्टाचारमूक्त कारभार करत आहे, असे प्रतिपादन दक्षिण गोव्याचे माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांनी केले.

प्रदेश भाजपने सांताक्रूज मतदारसंघात आयोजित केलेल्या अभ्यास वर्गात ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट-तानावडे, गुरुप्रसाद पावसकर, माजी सभापती राजेंद्र आर्लेकर, दामोदर नाईक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. येथील गोमंतक मराठा समाजाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे ऍड. नरेंद्र सावईकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

ऍड. सावईकर म्हणाले, देशाचे नेतृत्व कुशल आणि सक्षम असेल तर काय होऊ शकते हे सर्व देशाने गेल्या सात वर्षात पाहिले आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून भिजत पडलेल्या अनेक समस्या भाजप सरकारने सोडवल्या. यात तीन तलाक, राम मंदिराची उभारणी, जम्मू-काश्मीरचे कलम 370 आदींचा समावेश आहे. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना चीनने आपली भूमी मोठ्या प्रमाणात हडपली होती. यावर संसदेत उत्तर देताना पंडित नेहरू म्हणाले होते, चीनने बळकावलेल्या जमिनीवर गवताचे पातेही उगवत नाही. ती जमीन उपयोगाची नाही. पण विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिळमिळीत भूमिका न घेता डोकलाम, लडाख आणि पँगॉंगमधील चीनची कुरघोडी मोडून काढली. सुमारे 67 दिवस संघर्ष होऊनही भारतीय जवानांनी आपली एक इंचही जमीन चीनला बळकावू दिली नाही. भारतीय लष्कराच्या मागे नरेंद्र मोदी यांच्यासारखे भक्कम नेतृत्व आज उभे आहे.

यावेळी ऍड. सावईकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांनाही बोलते करून पक्षाचे धोरण, भूमिका आणि कार्य याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले.

भाजपच्यावतीने तिसवाडी तालुक्यातील 5 विधानसभा मतदारसंघात आज शनिवार दि. 9 आणि उद्या रविवार दि. 10 रोजी दोन दिवशीय अभ्यास वर्गाचे आयोजन केले आहे. यात पर्वरी, ताळगाव, सांताक्रूज, सांतआंद्रे, जुने गोवे या मतदारसंघांचा समावेश होता. आज शनिवारी पर्वरी येथील सुकूल पंचायत सभागृहात आयोजित अभ्यास वर्गाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट-तानावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एकूण पाच सत्रात झालेल्या अभ्यास वर्गास नागराज प्रभू, ऍड. नरेंद्र सावईकर, गोविंद पर्वतकर आदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी गुरुप्रसाद पावसकर, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष कार्तिक कुडणेकर, उपाध्यक्ष दीक्षा कानोळकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
ताळगाव पंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पर्वतकर यांच्या हस्ते करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या अभ्यास वर्गास माजी सभापती राजेंद्र आर्लेकर, ऍड. नरेंद्र सावईकर आणि वीजमंत्री निलेश काब्राल यांनी मार्गदर्शन केले.
सांतआंद्रे येथे आयोजित अभ्यास वर्गाचे उद्घाटन राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी दामोदर नाईक, गोरख मांद्रेकर, सुभाष फळदेसाई आणि नवीन पै रायकर उपस्थित होते.
जुने गोवे पंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमास नवीन पै रायकर, सुनिल देसाई, मंत्री निलेश काब्राल, दामोदर नाईक आणि गोरख मांद्रेकर उपस्थित होते.