अखिल भारतीय व्याघ्र अनुमान-2018 च्या चौथ्या अंकाचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन
ऐतिहासिक यश असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
गोवा खबर:जागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी अखिल भारतीय व्याघ्र अनुमान सर्वेक्षणाच्या चौथ्या अंकाचे प्रकाशन केले. या सर्वेक्षणानुसार देशातल्या वाघांची संख्या2967 पर्यंत पोहोचली आहे. भारतासाठी हे ऐतिहासिक यश आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
कभी ‘एक था टाइगर’ का डर था, लेकिन आज यह यात्रा ‘टाइगर जिंदा है’ तक पहुंच चुकी है।
लेकिन ‘टाइगर जिंदा है’ कहना ही पर्याप्त नहीं है, हमें उनकी संख्या बढ़ाने के लिए अनुकूल वातावरण भी तैयार करना है। #InternationalTigerDay pic.twitter.com/bERsYeM62v
— Narendra Modi (@narendramodi) July 29, 2019
व्याघ्र संरक्षणासाठी भारत कटिबद्ध असल्याचा पुनर्रुच्चार त्यांनी केला. व्याघ्र संवर्धनाच्या क्षेत्रात सर्व संबंधितांनी उत्तम काम केले आहे असे सांगत कामाच्या गतीचेही त्यांनी कौतुक केले. ‘संकल्प से सिद्धी’ याचे हे आदर्श उदाहरण आहे असे ते म्हणाले. जेव्हा भारतीय लोक काहीतरी करण्याचा निश्चय करतात तेव्हा जगातली कुठलीही ताकद त्यांना आपले उदिृष्ट मिळवण्यापासून रोखू शकत नाही असे पंतप्रधान म्हणाले.
जवळपास 3000 वाघांचे घर ठरलेला भारत आज वाघांसाठी सर्वात मोठे निवासस्थान आहे असे पंतप्रधान म्हणाले. पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात काही निवडक काम करण्यापेक्षा सर्वसमावेशक काम करण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. समग्र विचार केल्यावर विकास आणि पर्यावरण यांच्यात समतोल साधणं शक्य आहे असे ते म्हणाले. आपली धोरणे आणि अर्थव्यवस्थेत संवर्धनाविषयीचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.
भारतातील नागरिकांसाठी आम्ही आणखी घरे बांधणार आहोत मात्र त्याचवेळी वन्य प्राण्यासाठीही उत्तम अधिवास निर्माण करणार आहोत. भारतात एकाच वेळी सागरी अर्थव्यवस्थाही असेल आणि सागरी जीवसृष्टीचे संवर्धनही केले जाईल. या समतोलातूनच आपण एक मजबूत आणि सर्वसमावेशक भारत निर्माण करु शकतो असे पंतप्रधान म्हणाले.
भारत आर्थिकदृष्ट्या आणि पर्यावरणदृष्ट्याही समृद्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतात चांगले रस्ते निर्माण होतील तसेच स्वच्छ नद्याही असतील. रेल्वेचे उत्तम जाळे असेल त्यासोबतच चांगले वन आच्छादनही असेल असे मोदी म्हणाले.
गेल्या पाच वर्षात देशात अत्याधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी करण्याच्या दिशेने जलद गतीने काम होत आहे. मात्र त्याचवेळी वन आच्छादनही वाढले आहे. संरक्षित वन क्षेत्रात वाढ झाली आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. 2014 साली 692संरक्षित वन क्षेत्रं होती. आज 2019 पर्यंत त्यांची संख्या 860 इतकी झाली आहे. त्याशिवाय सामुदायिक संरक्षित वनं क्षेत्रांची संख्या 2014 मध्ये 43 इतकी होती. ती आता 100 च्या पुढे गेली आहे.
भारतीय अर्थव्यवस्था ‘स्वच्छ इंधन आधारित’ आणि ‘शाश्वत ऊर्जा आधारित’ व्हावी यासाठी सरकार अविरत प्रयत्न करत आहे. भारताला ऊर्जा क्षेत्रात सुरक्षित करण्यासाठी घन कचरा आणि जैव कचऱ्यापासून निर्माण होणार बायोगॅस महत्वाचे योगदान देत आहे. उज्ज्वला आणि उजाला या योजनांचाही त्यांनी उल्लेख केला.
व्याघ्र संवर्धनासाठी आणखी जास्त प्रयत्न होण्याची गरज आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो आणि पर्यावरण सचिव सी.के.मिश्रा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.