देशभरातील १०० डॉक्टरांच्या देखरेखीत आयुर्वेदिक न्यूरो थेरेपी आरोग्य शिबीर सुरु 

0
1243
   
गोवा खबर:म्हापसा येथील दयानंद बांदोडकर क्रीडा संकुलामध्ये आजपासून आयुर्वेदिक न्यूरो थेरेपी आरोग्य शिबीर सुरु झाले आहे. मातृभूमी सेवा प्रतिष्ठान, गोवा, मेधा पर्रीकर रुग्ण सेवा केंद्र, म्हापसा, केंद्रीय योग व निसर्गोपचार संशोधन संस्था, आयुष मंत्रालय, आयुष विभाग, गोवा सरकार, क्रीडा विभाग, गोवा, युथ हॉस्टेल यांच्या संयुक्त विद्यमाने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गोव्यामध्ये होणारे हे दुसरे शिबीर असून पहिल्या शिबिराला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद व नागरिकांनी केलेली मागणी पाहता, पुन्हा एकदा या आरोग्य शिबिराचे आयोजन केले असल्याचे असल्याचे आयोजकांनी सांगितले.
दिनांक २४ जून ते ३० जून या सात दिवसांच्या कालावधीत नागरिकांना येथे मोफत उपचार मिळणार आहेत. आखडलेले खांदे, पाठदुखी, मणक्याचा त्रास अशा सतत डोके वर काढणाऱ्या त्रासावर या शिबिरात उपचार केले जाणार आहेत. हे उपचार देण्यासाठी देशभरातून १०० डॉक्टर स्वखर्चाने गोव्यात दाखल झाले असून या सेवेसाठी ते कोणतेही मानधन घेणार नाहीत.
या आरोग्य शिबिराचे उदघाटन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना नाईक म्हणाले की, आरोग्य हे सर्वात मोठे धन आहे, त्यामुळे या क्षेत्रात सतत काम करत असतो. आयुर्वेद म्हणजे आपली पारंपारिक, हजारो वर्ष जुनी आरोग्य, उपचार पद्धती आहे. परकीय आक्रमक तसेच पारतंत्र्यात हे ज्ञान दाबले गेले. शिवाय भारताकडे मोठी बाजारपेठ म्हणून पाहताना स्वतःची उत्पादने लादण्यासाठी दिशाभूल केली गेली, असे मत त्यांनी यावेळी मांडले.
आधुनिक उपचार पद्धती खर्चिक असून बेभरवशाची देखील असल्याचे नाईक म्हणाले. आयुर्वेद आजारी पडू नये म्हणून काळजी घेते. परत एकदा आपल्या मूळच्या भारतीय जीवनशैली कडे आपण वळायला हवे, असे आवाहन नाईक यांनी केले.
नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले. जनतेने व गोवा सरकारने केलेल्या सर्व सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले. लवकरच आपण दक्षिण गोव्यातही अशा शिबिराचे आयोजन करणार आहोत, अशी माहिती श्रीपाद नाईक यांनी दिली.
उदघाटन कार्यक्रमात राज्याचे पर्यटन मंत्री मनोहर अजगांवकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर तसेच प्रमुख आयोजक डॉ. मनोज शर्मा व इतर काही मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मातृभूमी सेवा प्रतिष्ठानचे डॉ. मनोज शर्मा यांनी लिहिलेल्या ‘आयुर्वेद’ अनुभूत योग्य संग्रह या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.