देविदास वेळीप मृत्युप्रकरणी कनिष्ठ अभियंत्यास निलंबित करा : शिवसेना 

0
1292

  गोवाखबर : सांगे गावातील विद्युत खात्याचे हेल्पर देविदास वेळीप यांचा विजेचा धक्का  बसून झालेला मृत्यू हा विद्युत खात्याच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे.याला जे जबाबदार आहेत त्यांची विभागाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी आज शिवसेनेने केली आहे.
      वेळीप यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी गोवा शिवसेनेच्या उपाध्यक्ष व प्रवक्त्या राखी प्रभुदेसाई नाईक, कार्यकारिणीचे सदस्य वंदना लोबो, झायगल लोबो, रजनी वेळुस्कर, श्रीकृष्ण वेळुस्कर, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष अलेक्सी फर्नांडिस, केपे तालुका प्रमुख संजय देसाई यांनी आज वीज खात्याच्या मुख्य विद्युत अभियंत्यास सादर केलेल्या निवेदनात केली आहे.
        वेळीप हे आपल्या विभागात हेल्पर म्हणून काम करीत होते आणि त्यांनी लाइनमनला सहाय्य करणेच अपेक्षित होते. लाइनमनला विजेबाबतचे आणि वीजवाहक तारेत निर्माण झालेली समस्या कशी हाताळावयाची याचे ज्ञान असते.   अशी पेचप्रसंगाची परिस्थिती कशी हाताळावयाची याचे कोणतेही औपचारिक ज्ञान नसतानाही वेळीप यांना वीजवाहिनीवर काम करण्यास पाठविण्यात आले, हे धक्कादायक आहे. अशा कामांसाठी बंधनकारक असणारी संरक्षक साधनेही त्यांच्याजवळ नव्हती, याकडे शिवसेनेने लक्ष वेधले आहे.
      विद्युत विभागाने या प्रकरणी तपशीलवार चौकशी करून वेळीप यांना हे धोकादायक काम करायला लावून त्यांचा जीव घेणाऱ्या लोकांना जबाबदार धरावे अशी आमची मागणी आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
      सांगे विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याची ही नैतिक जबाबदारी असल्याने चौकशी सुरु असेपर्यंत त्याला निलंबित करावे. तो यापुढेही सेवेत राहिल्यास पुराव्यात फेरबदल करू शकतो, असेही निवेदनात म्हटले आहे.
     चौकशी  शक्यतो १५ दिवसांत केली जावी आणि त्याचा अहवाल जाहीर केला जावा. त्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यावर भारतीय दंडविधानाच्या संबंधित कलमांखाली आरोप ठेवावेत. खून नव्हे पण सजापात्र मनुष्यवध या कलमाचा त्यात समावेश असावा,अशी मागणी सेनेने केली आहे.
      मृत हेल्पर हा  कुटुंबातील एकमेव कर्ता पुरुष असल्याने त्याच्या पत्नीला विद्युत विभागात त्वरित नोकरीस ठेवण्यात यावे, अशी आणखी एक मागणी करतानाच  तिची शैक्षणिक पात्रता व कसब लक्षत घेऊन तिला तातडीने सेवेत घेतले जाऊ शकते,असे प्रभूदेसाई यांनी वीज खात्याच्या निदर्शनास आणून दिले आहे.