दूसरा दिवसही फॉर्मेलिनमय

0
1086
गोवा खबर : फॉर्मेलिन विषयावरुन दुस-या दिवशीही  काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. यामुळे निर्माण झालेल्या गोंधळात सभागृहाच्या कामात व्यत्यय आला.सकाळी कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी फॉर्मेलिनच्या विषयावर चर्चेची मागणी लावून धरली त्यामुळे सुरूवातीला दुपारी अडीच पर्यंत आणि दुपारी सोमवारी सकाळी साडे अकरा वाजे पर्यंत कामकाज तहकुब करावे लागले.
 सकाळच्या सत्राचे कामकाज तहकूब झाल्यानंतर ,परप्रांतांमधून येणा-या मासळीवर आम्ही बंदी घातली आहे. शिवाय सीमेवरून काही ट्रक परतही पाठवले आहेत.  सरकार कारवाई करत आहे. विरोधी काँग्रेस पक्ष मात्र प्रसिद्धीसाठी विधानसभेचे कामकाज बंद करत आहे. विरोधकांनी स्थगन प्रस्तावाची नोटीस गुरुवारी दिली होती, तो विषय गुरुवारीच संपला. सरकारने कृती केल्याने आता फॉर्मेलिन मासेप्रश्नी तातडीने चर्चा करण्याची गरज नाही. मी सोमवारी विधानसभेत लक्ष्यवेधी सूचनेला उत्तर देईन. एफडीए व मच्छीमार अशा दोन खात्यांशी हा विषय निगडीत असून दोन्ही खात्यांकडून माहिती आल्यानंतर सोमवारी मला उत्तर देता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मासळी निर्यात बंदीचा विचार : विश्‍वजित राणे

राज्यातील मच्छीमारांकडून उपलब्ध होणार्‍या मासळीची निर्यात   बंद करण्याचा विचार असून त्यामुळे ‘मासळीमध्ये फार्मेलिन’प्रश्‍नी कायमचा तोडगा निघेल, असा विश्‍वास आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी व्यक्‍त केला. परराज्यातून आयात होणार्‍या मासळीला राज्यात कायमची बंदी घालण्याबाबतही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
शुक्रवारी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू झाले तेव्हा सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. यावेळी प्रथम विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर उभे राहिले. फॉर्मेलिन मासळीच्या विषयावर 15 लाख गोमंतकीय खूप चिंतेत आहे. प्रत्येकाला स्वत:च्या आरोग्याची काळजी आहे. अशावेळी सरकारने फॉर्मेलिन मासेप्रश्नी आता तरी चर्चा सुरू करावी, आमचा स्थगन प्रस्ताव आता विचारात घ्यावा, असे कवळेकर म्हणाले. स्थगन प्रस्तावाचा विषय काल गुरुवारी होता, तो कालच संपला. तुम्ही शुक्रवारी पुन्हा स्थगन प्रस्तावाची नोटीस दिलेली नाही, येत्या सोमवारी मुख्यमंत्री फॉर्मेलिन मासेप्रश्नी उत्तर देतील, असे सभापतींनी विरोधी आमदारांना सांगितले. मात्र सभापतींचे म्हणणे काँग्रेस आमदारांना मान्य झाले नाही. जेव्हा मंत्री, आमदार आजारी असतात तेव्हा गोमंतकीय जनता त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असते, गाऱ्हाणे घालत असते, आता लोकांच्या आरोग्याची काळजी म्हणून आम्ही विधानसभेत  फॉर्मेलिनप्रश्नी तातडीने चर्चा करायला नको काय असा प्रश्न कवळेकर यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव आता चर्चेसाठी घ्या, असे कवळेकर म्हणाले. स्थगन प्रस्ताव आता नाहीच असे मुख्यमंत्री पर्रिकर यांनी सांगितले. त्यानंतर काँग्रेसचे सगळे आमदार उभे राहिले व त्यांनी मासळीप्रश्नी चर्चेचा आग्रह धरला. तुम्ही विधानसभेचा वेळ वाया घालवत आहात, असे सभापती विरोधकांना म्हणाले. मुख्यमंत्री आजारी होते तेव्हा आम्ही 22 दिवसांचे अधिवेशन चार दिवसांवर आणण्यासाठी सरकारला सहकार्य केले होते, असा उल्लेख कवळेकर यांनी केला. त्यास मुख्यमंत्र्यांसह काही मंत्र्यांनीही आक्षेप घेतला. यावेळी सभागृहात गोंधळ वाढला. आम्हाला प्रश्नोत्तराचा तास झालेला हवा आहे, अशी मागणी भाजपचे आमदार राजेश पाटणोकर व निलेश काब्राल करू लागले. विरोधी काँग्रेस आमदार चर्चेचा आग्रह धरत सभापतींच्या आसनासमोर धावले. यावेळी सभापतींनी दुपारी अडीच वाजेर्पयत कामकाज तहकुब केले जात असल्याचे जाहीर केले.

विरोधकांनी बोलण्याची संधी गमावली : सभापती

गोंधळ माजवून सभागृहाचे कामकाज वाया घालवणे योग्य नाही. फार्मेलिनप्रश्‍नी लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर विरोधकांनी त्यावर बोलणे अपेक्षित होते, मात्र संधी असूनही ते बोलले नाहीत, असे गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.विरोधकांनी सभागृहाचा वेळ वाया घालवला. त्यांनी कामकाज   स्थगित करण्याची नोटीस दिली. मात्र त्यात कुठेही प्रश्‍नोत्तर तास स्थगित करा, असा उल्‍लेख नव्हता, असेही त्यांनी सांगितले.
फार्मेलिनयुक्‍त मासळी हा संपूर्ण गोमंतकीयांचा विषय आहे:बाबू कवळेकर
विधानसभेचे कामकाज आम्हाला बंद पाडायचे नव्हते. फार्मेलिनयुक्‍त मासळी हा विषय केवळ विरोधी पक्षातील 16 आमदारांपुरताच मर्यादित नसून संपूर्ण गोमंतकीयांचा आहे. विरोध करायला हवा म्हणून तो करायचा, असा आमचा मुळीच उद्देश नव्हता किंवा ‘कामकाज चालूच द्यायचे नाही’ असे आधीच नियोजनही करून आम्ही आलो नव्हतो, असे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी दिले.
दुपारी अडीचनंतर कामकाजाला पुन्हा आरंभ झाला, त्यावेळीही आमदारांनी फॉर्मेलिन मासळीप्रश्नी चर्चा व्हावी, अशी मागणी सुरू केली. यावेळीही गोंधळ झाल्यानंतर सोमवार्पयत सभापतींनी कामकाज तहकूब केले आहे.
काँग्रेसच्या नेत्यांना विधानसभा अधिवेशन कामकाजाचे नियम माहित नाहीत: भाजप

विधानसभेचे सदस्य म्हणून 3 ते 50 वर्षे घालविलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना विधानसभा अधिवेशन कामकाजाचे नियम माहित नाही, अशी टिका भाजप आमदार निलेश काब्राल यांनी पत्रकार परिषदेत केली.काँग्रेसचे सभागृहात तीन-चार माजी मुख्यमंत्री आहेत. काही काँग्रेस आमदारांनी विधानसभा सदस्य म्हणून 30 ते 40 वर्षांपर्यंत काम केले आहे, पण त्यांना कामकाजाचे नियम माहित नाही. नियमावलीची पुस्तके ते डोक्याखाली घेऊन झोपतात, अशी टिका निलेश काब्राल यांनी केली. विधानसभा कामकाजाचे दिवस वाढवा म्हणून काँग्रेस नेते मागणी करीत होते आणि आता सभागृह रोखून धरून वेळ वाया घालवितात. यामागे काँग्रेसचा हेतू चांगला नाही. हा विरोधी काँग्रेस पक्षाचा बेजबाबदारपणा असल्याचा आरोपही त्यांनी केला. अनेक दिवंगत व्यक्तींच्या श्रद्धांजलीचा प्रस्ताव होता. त्यावरही बोलता आले नाही.