दूधसागर धबधबा पर्यटन हंगामाला सुरुवात

0
1035
 गोवा खबर:जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या कुळे येथील दूधसागर धबधबा पर्यटन हंगामाला कालपासून सुरुवात झाली. दूधसागर पर्यटनाला आलेल्या देशी पर्यटकांच्या पहिल्या तुकडीचे स्वागत  आमदार दीपक  पाऊसकर यांनी कुळे येथे केले. त्यानंतर वनखात्याचे फाटक उघडून पर्यटकांच्या जीपगाडयांना धबधब्याकडे जाणारा मार्ग खुला करण्यात आला.
या कार्यक्रमाला सावर्डे मतदारसंघाचे आमदार दीपक पाऊसकर, मोले वन्यजीव विभागाचे वनाधिकारी परेश परोब, कुळे शिगांव पंचायतीचे सरपंच मनीष लांबोर, कुळे पोलीस स्थानकाचे निरीक्षक निलेश धायगोडकर व दूधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते,अशी  माहिती टूर ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष ट्रिपोलो सौझा यांनी दिली.
कुळे येथून दूधसागर धबधब्यावर पर्यटकांची वाहतूक करण्यासाठी सुमारे 431 जीपगाड्या सज्ज आहेत. गेल्या वर्षीचा पर्यटन हंगाम 31 मे रोजी बंद करण्यात आला होता. त्यामुळे जीपमालकांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र यंदाचा हंगाम लवकर सुरु होत असल्याने अनेक जीपमालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या पर्यटन हंगामात सुमारे 49 हजार ट्रिप्स झाल्या होत्या. सध्या प्रवेश शुल्क म्हणून वनखात्यातर्फे  जीप मालकाकडून साडेसात हजार रुपये प्रत्येक हंगामाला आकारले जातात. शिवाय प्रत्येक पर्यटकाकडून पन्नास रुपये, लहान कॅमेरासाठी तीस रुपये तर मोठया कॅमेरासाठी दीडशे रुपये आकारले जातात. जीपमधून एकावेळी सात पर्यटकांना नेण्याची परवानगी आहे.