दुसरा महिला लघुपट महोत्सव उत्साहात

0
1082
लघुपट म्हणजे उत्तम सिनेमाची पायाभरणी
गोवा खबर:ज्याप्रमाणे एकांकिका या नाटकाच्या पाया रचण्याचे काम करतात त्याचप्रमाणे लघुपट हे उत्तम सिनेमा बनवण्याचा शिक्षण असते आणि त्यातूनच सिनेमाची पायाभरणी होते त्यामुळे नव्या समीकरणे अधिकाधिक उत्तम लघुपट करण्यावर भर द्यावा असे आवाहन राष्ट्रीय पारितोषिक विजेते सिनेकर्मी राजेश पेडणेकर यांनी केले.
कृष्णदास शामा मध्यवर्ती ग्रंथालयात  पार पडलेल्या सहित आयोजित महिला लघुपट महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्य मंत्री चंद्रकांत कवळेकर आणि माजी मुख्यमंत्री तथा आमदार चर्चिल आलेमाव तसेच सहितचे किशोर अर्जुन यांची उपस्थिती होती.
सिनेमासाठी किंवा लघुपटासाठी संकल्पना शोधण्यासाठी एकीकडे फिरण्याची गरज नाही. अनेक उत्तमोत्तम कल्पना आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये असतात. त्यातून सुयोग्य गोष्ट निवडून यावरती लघुपट केल्यास तो सर्वसामान्यांना अधिक भावतो, असेही पेडणेकर यांनी यावेळी नमूद केले. महिला या जन्मजात बहुक्रियाशील असतात त्यामुळे या जेव्हा सिनेनिर्मिती करतात तेव्हा ते अधिक सृजनात्मक असते, असेही पेडणेकर यांनी सांगितले.
या महोत्सवामध्ये मानसी देवधर दिग्दर्शित  भैरू या लघुपटाला  उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाले. तर बोली दोंगरा पळसातली या या माहितीपटाला माहितीपटाचा पुरस्कार मिळाला. तर ऑप्शन या लघुपटासाठी शिल्पा गोडबोले यांना दिग्दर्शनाचा आई तुझा फोन यासाठी रश्मी आमडेकर यांना उत्कृष्ट संकल्पनेचा पुरस्कार मिळाला. सुपर्णा गांगल यांच्या रचना या लघुपटाला पटकथेचा पुरस्कार मिळाला. कुछ तो लोग कहेंगे या लघुपटासाठी युवराज जडेजा यांना उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी चे पारितोषिक मिळाले तर अवयवदानाचे महत्व पटवून देणाऱ्या धनश्री गणात्रा यांच्या सफर या लघुपटाला विशेष उल्लेखनीय पारितोषिक देण्यात आले. भैरू लघुपटाने उत्कृष्ट पोस्टरचाही पुरस्कार पटकावला.
यावेळी  गोव्यामध्ये सांस्कृतिक आणि बौद्धिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या आणि आयोजनामध्ये 40 टक्‍क्‍यांहून अधिक सक्रिय महिलांचा समावेश असणाऱ्या परिक्रमा या संस्थेचा मान्यवरांच्या हस्ते  विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार सहितच्या किशोर अर्जुन यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  शिल्पा निळकंठ यांनी केले. यावेळी महिला लघुपट स्पर्धेच्या तिसऱ्या आवृत्तीची ही अधिकृत घोषणा करण्यात आली.