दिव्यांगजनासाठी उपयुक्त साधनांच्या आधुनिकीकरणासाठी सरकार कार्यरत: गेहलोत

0
1033
The Union Minister for Social Justice and Empowerment, Shri Thaawar Chand Gehlot interacting with the children implanted with Cochlear Hearing Implant Devices, at Ali Yavar Jung National Institute for Speech and Hearing Disable, in Mumbai on April 26, 2018.

 दारिद्रयरेषेखालच्या ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठीच्या वयोश्रीयोजनेअंतर्गत येत्या तीन वर्षात 5.2 लाख वरिष्ठ नागरिकांना लाभ होणार

गोवा खबर:  दिव्यांगजनाच्या मदतीसाठी केंद्र सरकारने अनेक उपाययोजना हाती घेतल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी आज मुंबईत एका कार्यक्रमात सांगितले. दिव्यांगजन कल्याणासाठीच्या त्यांना उपयुक्त ठरणाऱ्या साधनांच्या आधुनिकीकरणासाठी सरकार कार्यरत आहे. कृत्रिम अवयव तयार करण्यासाठी जर्मन संस्थेसमवेत सरकारने काम सुरु केले आहे. दिव्यांगजनांच्या सबलीकरणासाठीच्या खात्याने गेल्या चार वर्षात, पाच गिनिज जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. केंद्र सरकारने दिव्यांगजनासाठी 600 कोटी रुपयांच्या साधनांचे वाटप केले असून, त्याचा 10 लाख दिव्यांगजनांना लाभ झाल्याचे ते म्हणाले. या वाटपात सरकारने पारदर्शकता आणल्याचेही ते म्हणाले.

1200 कर्णबधीर मुलांवर प्रत्येकी सहा लाख रुपये खर्चाची कॉक्लीयर इंप्लांट करण्यात आले असून, त्यामधे अली यावर जंग राष्ट्रीय संस्थेचे मोठे योगदान राहिल्याचे त्यांनी नमूद केले. या सर्व मुलांना आता ऐकायला येऊ लागले असून, त्यापैकी बरीच मुले बोलूही लागल्याचे त्यांनी सांगितले.

कॉक्लीयर इंप्लांटसाठी मागणी वाढली असून, 1200 मुलांच्या इंप्लांटनंतरही 2000 जणांची प्रतिक्षा यादी असून, सरकार याची पूर्तता करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.

80 टक्के दिव्यांगजनांना उभे राहण्यासाठी सक्षम नसल्याचे लक्षात घेऊन त्यांच्या मदतीसाठी सरकार इलेक्ट्रीक तिचाकी पुरवत आहे,असे सांगून आतापर्यंत अशा 5000 तिचाकींचे वाटप करण्यात आले आहे.

दारिद्रयरेषेखालच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांना उपयुक्त अशी सहाय्यक साधने पुरवणाऱ्या वयोश्री योजनेचा यावेळी गेहलोत यांनी प्रारंभ केला. वार्धक्यामुळे येणाऱ्या शारीरिक दुर्बलतेवर मात करण्यासाठी ही उपकरणे उपयुक्त ठरणार आहेत. येत्या तीन वर्षात सुमारे 5.2 लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होईल, अशी अपेक्षा आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थीला 7000 रुपयांपर्यंतची साधने आणि सहाय्यक उपकरणे मिळणार आहेत. ऐकू येण्यासाठी यंत्रे, वॉकर, कवळी यांचा यात समावेश आहे. यासाठी 18 ठिकाणी शिबीर आयोजित करण्यात आली असून, आतापर्यंत तीन लाख लोकांना या सहाय्यक उपकरणांचे वाटप करण्यात आले आहे.

एखाद्या व्यक्तीला अशा उपकरणांच्या मदतीची गरज असल्याची माहिती मिळाल्यानंतर जनतेने आपल्या खात्याशी संपर्क साधावा. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना सरकारी योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्यासाठी मदत करावी, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

एएलआयएमसीओची वार्षिक उलाढाल 4 कोटीवरुन 250 कोटीपर्यंत पोहोचली आहे.

अली यावर जंग नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ स्पीच ॲन्ड हिअरिंग डिसॲबिलीटीच्या आधुनिकीकरणासाठी सरकार प्रयत्नशील आहे असे सांगून गेल्या चार वर्षात 6 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची अंमलबजावणी झाल्याची माहिती त्यांनी दिली. जास्तीत जास्त लोकांपर्यंत योजना पोहोचण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले.

अली यावर जंग इन्स्टीट्युटच्या कर्णबधीरांसाठीच्या सेवेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन यंत्रणेचा प्रारंभही मंत्र्यांनी केला. नव्या तसेच जुन्या रुग्णांनाही उपचारासाठी अथवा उपचारांसंदर्भात भेटीची वेळ ठरविण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन उपयुक्त ठरणार आहे. ऐकू येणे, बोलणे यासंदर्भातल्या तपासणी आणि उपचारासाठी, शैक्षणिक मार्गदर्शनासाठी, व्यावसायिक सेवांसाठी ऑनलाईन अपॉईटमेंट घेता येणार आहे. ही सेवा आधार आणि मोबाईल क्रमांकावर आधारीत आहे. कॉक्लीयर इंप्लांट केलेल्या मुलांची, मंत्र्यांनी भेट घेतली तसेच नियमित शाळांमधे दाखल झाल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्रांचे वाटपही केले.