दिवाळखोर भाजप सरकारचा दंडाच्या शुल्कावर तिजोरी भरण्याचा डाव, उत्सव काळात १४४ कलम लागू करणाऱ्या भाजप सरकारचे बहुजन समाज व अल्पसंख्याकाच्याविरोधी धोरण उघड : गिरीश चोडणकर 

0
211
गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील असंवेदनशील, बेजबाबदार आणि दिशाहीन भाजपा सरकारने चुकीच्या धोरणांमुळे राज्याची तिजोरी संपवून गोव्याला दिवाळखोरीत ढकलले आहे. भ्रष्ट भाजप सरकार दंडाच्या शुल्काचा आधारावर तिजोरी भरण्याचा डाव आखत आहे अशी घणाघाती टीका गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली  आहे.
चोडणकर यांनी आज कॉंग्रेस हाऊस पणजी  येथे पत्रकार परिषद घेवून भाजप सरकारच्या लोकविरोधी धोरणाचे वाभाडे काढले. ह्या वेळी तुलियो डिसोझा आणि एनएसयूआय नेते नौशाद उपस्थित होते.
शिमगोत्सव, इस्टर, शब-ए-बारात या पारंपारिक सणांच्यावेळी १४४ कलम लागू करुन, भाजप सरकारने बहुजन समाज आणि अल्पसंख्याकांना उत्सवांत सहभागी होण्यापासुन  वंचित केले व हे सरकार त्यांच्या विरोधी असल्याचे दाखवून दिले असे गिरीश चोडणकर यांनी सांगीतले.
कोविड मध्ये वाढ झाल्याने सध्या जवळजवळ सर्व रुग्णालये व कोविड केअर सेंटर रुग्णांनी भरलेली आहेत. कोविड प्रकरणे कमी होती तेव्हा राज्यात १४४ कलम लागू केले होते, व जेव्हा कोविड रुग्णांमध्ये वाढ झाली तेव्हा हे कलम मागे घेतले.  या मागची गोम काय याबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता द्यावी अशी मागणी चोडणकर यांनी केली.
मूर्ख भाजपा सरकारने आता एका बाजुला सार्वजनिक कार्यक्रमांना अधिकृतपणे परवानगी दिली आहे, तर दुसरीकडे अंमलबजावणी करणारी यंत्रणा लोकांना दंड देत आहे. या प्रकारातून मुख्यमंत्र्यांची बौद्धिक दिवाळखोरी सिद्ध होते असे  गिरीश चोडणकर म्हणाले.
भाजप आमदारांचा वाढदिवस, भाजप स्थापना दिन कार्यक्रम व हुनर हाट प्रदर्शन इत्यादी सोहळ्याद्वारे  भाजपाने पुन्हा एकदा जाणीवपुर्वक लोकांना कोविडमध्ये ढकलले आहे असे ते म्हणाले.
लोकांना दंड देण्याच्या अगोदर, पोलिस महासंचालकांनी मांद्रे येथील वाढदिवस कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत व भाजपचे पदाधिकारी, तसेच हुनर हाट प्रदर्शनाच्या आयोजकां विरोधात १४४ कलमचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा नोंदवावा मागणी चोडणकर यांनी केली  आहे.
निर्लज्ज भाजपा सरकार लोकांना दंड देवून पैसे गोळा करण्यात व्यस्त आहे. भाजपने खरे तर लोकांना मोफत मास्क द्यायला हवे होते असे चोडणकर म्हणाले.
चांगले रस्ते व साधन सुविधा जो पर्यंत लोकांना मिळत नाही, तो पर्यंत नवीन मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करायला आम्ही  देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
हे सरकार तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात अपयशी ठरले, नवीन व्यवसाय आणि गुंतवणूक आणण्यात ते अपयशी ठरले, म्हादई  वाचविण्यात अपयशी ठरले, खनिज व्यवसाय सुरु करण्यातही अपयशी ठरले आहे. फक्त  २१ भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गोवा लोकायुक्तांकडून प्रमाणपत्र मिळवणे व भांडवलदारांना गोवा विकणे यात त्यांना यश मिळाल्याचे गिरीश चोडणकर म्हणाले.