दिवसभरात दोन गोमंतकीय कोरोना संशयित म्हणून गोमेकॉत दाखल

0
478
 गोवा खबर:विदेशातून गोव्यात आल्यानंतर खोकला आणि ताप येत असल्याने वास्को येथील तरुण आणि साखळी येथील तरुणीला आज गोमेकॉमध्ये कोरोना संशयित म्हणून दाखल करण्यात आल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
विदेशातील अनेक देशात फैलावलेल्या कोरोना व्हायरसने आता देशात देखील हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.
 क्रुझवर काम करत असताना इटलीमध्ये जाऊन आलेल्या वास्को येथील तरुणाला गेल्या दोन दिवसांपासून खोकला आणि ताप येत असल्याने त्याला आज सकाळी गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहे.
ही घटना ताजी असताना दुबई  येथून आलेल्या 23 वर्षीय साखळी येथील तरुणीला खोकला आणि ताप येत असल्याने दुपारी तिला देखील गोमेकॉत दाखल करावे लागले आहे.
गोवा मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिलेल्या माहिती नुसार वास्को येथील एका 27 वर्षीय तरुणाला गेल्या दोन दिवसांपासून खोकला आणि ताप येत असल्याने कोरोना रुग्णांसाठी गोमेकॉत 113 वॉर्डमध्ये सुरु करण्यात आलेल्या विशेष कक्षात आज सकाळी त्याला दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.
 हा तरुण क्रुझवर काम करत होता.जून 2019 रोजी क्रुझवर कामावर जाण्यासाठी गोवा सोडला होता.
ही क्रुझ बोट फेब्रूवारी मध्ये यूरोप मधील फिनलँड आणि इटलीत जाऊन आली होती.
फेब्रूवारीच्या मध्यास तो तरुण क्रुझवरील एका कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आला होता.
नुकताच तो कतार एअरलाइन्सच्या विमानाने गोव्यात परतला होता.गेले दोन दिवस त्याला खोकला आणि ताप येत असल्याने आज सकाळी त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
 दरम्यान,दुबईहून 8 मार्च रोजी गोव्यात परतलेल्या साखळी येथील २३ वर्षीय तरुणीला करोनाच्या संशयावरून आज दुपारी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
ही तरुणी 30 नोव्हेंबर 2019 पासून दुबई मध्ये होती,8 मार्च रोजी ती एअर इंडियाच्या एआय 994 विमानाने गोव्यात परतली होती.काल पासून खोकला आणि ताप येत असल्याने तिला आज दुपारी गोमेकॉमधील कोरोना रुग्णांसाठी खास बनवलेल्या 113 नंबरच्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
आज दिवसभरातील ती दुसरी गोमंतकीय संशयित रुग्ण ठरली,आज सकाळीच वास्को येथील तरुणाला गोमेकॉमध्ये कोरोना संशयित म्हणून दाखल करण्यात आले आहे.
गोव्यातील दोघे कोरोना संशयित म्हणून गोमेकॉत दाखल झाल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काल राज्यात धूलिवंदन साजरे करण्यात आले. त्यावेळीही कोरोनाच्या सावटाचे चित्र पहायला मिळाले होते.