दिवंगत मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या अस्थींचे आज राज्यात होणार विसर्जन

0
858
गोवा खबर: दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अस्थींचे चाळीस कलश भाजपाकडून तयार करण्यात आले आहेत. हे कलश सोमवारी भाजपच्या गट अध्यक्षांकडे सोपवण्यात आले. चाळीस पैकी 38  विधानसभा मतदारसंघांमध्ये आज मंगळवारी हे कलश फिरविले जातील. त्यानंतर  सायंकाळी स्थानिक नद्यांमध्ये अस्थींचे विसर्जित करण्यात येणार आहेत. 
पेडणे आणि काणकोण तालुक्यात उद्या शिमगोत्सव असल्याने तेथे परवा अस्थींचे विसर्जन होईल, असे यावेळी सांगण्यात आले.
कलश प्रदान करण्याचा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी भाजपाच्या मुख्यालयासमोर झाला. त्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर,आरोग्यमंत्री विश्वजित राणे,विज मंत्री नीलेश काब्राल, पक्षाचे उपाध्यक्ष दयानंद मांद्रेकर,सरचिटणीस सदानंद तानावडे, पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर आदी उपस्थित होते.
पर्रीकर यांना सरकारी पातळीवरून श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम 28 मार्च रोजी कला अकादमीत होणार आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह पर्रिकर यांना मानणारे लोक मोठ्या संख्येने अवस्थित राहणार आहेत.मनोहर पर्रीकर यांच्या जीवनावर एक पुस्तकही सरकार प्रकाशित करणार आहे. लोकांनी त्यासाठी लेखन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.पर्रिकर हे त्यांचे कार्य आणि विचार यामुळे सदैव लोकांच्या मनात जीवंत राहतील असे मुख्यमंत्री म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी देखील पर्रिकर यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना आदरांजली वाहिली.