दिल्लीतील 95 टक्के वायू प्रदूषण स्थानिक घटकांमुळे : प्रकाश जावडेकर

0
137

वास्तववादी प्रतिसादासाठी दिल्ली आणि एनसीआर शहरांमध्ये सीपीसीबीची 50 पथके तैनात

गोवा खबर : हवेची उत्तम गुणवत्ता सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांतर्गत, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची (सीपीसीबी) 50 पथके आजपासून दिल्ली-एनसीआर शहरांमध्ये विस्तृत क्षेत्र भेटीसाठी तैनात करण्यात आली आहेत.

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्ली येथे पथकांच्या नोडल अधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, कोविडच्या सध्याच्या काळात पथकाचे सदस्य कोरोना योद्धयांपेक्षा कमी नाहीत कारण ते प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन अभिप्राय देतील ज्यामुळे वायू प्रदूषण कमी करण्यात मदत होईल.

जावडेकर म्हणाले की, आजच्या तारखेला शहरातील सुमारे 95 टक्के प्रदूषण हे धूळ, बांधकाम आणि बायोमास जाळणे  या स्थानिक कारणांमुळे आहे आणि शेतमाल अवशेष जाळल्यामुळे झालेले प्रदूषण केवळ 4 टक्के आहे.

प्रमुख वायू प्रदूषण करणाऱ्या  स्रोतांची त्वरित माहिती देणे, म्हणजे योग्य नियंत्रण उपायांशिवाय  मुख्य बांधकाम कामे,  रस्त्यांच्या कडेला आणि उघड्या जागेवर कचरा आणि बांधकाम साहित्य  टाकणे , कचरा / औद्योगिक कचरा मोकळ्या जागेत जाळणे, इत्यादी कामांबाबत समीर ऍपद्वारे त्वरित माहिती दिली जाईल.

ही पथके उत्तर प्रदेशातील दिल्ली आणि नोएडा, गाझियाबाद, मेरठ ही  एनसीआर शहरे, हरियाणामधील गुरुग्राम, फरीदाबाद, वल्लभगड , झज्जर, पानीपत,  सोनेपत; आणि राजस्थानमधील भिवडी, अलवर,  भरतपूरचा दौरा करतील.  ही समस्या आणखी वाढली आहे अशा हॉटस्पॉट भागात ही पथके  विशेष लक्ष केंद्रित करतील.

प्रदूषण करणाऱ्या  उपक्रमांबाबतचा  अभिप्राय त्वरित कारवाईसाठी स्वयंचलित प्रणालीद्वारे संबंधित संस्थेबरोबर सामायिक केला जाईल. तपशील राज्य सरकारांबरोबर देखील सामायिक केला जाईल. यामुळे संबंधित संस्थांकडून योग्य स्तरावर वेळेवर कारवाई आणि  देखरेखीत  मदत होईल.

प्रदूषणाच्या पातळीचा दर तासाला आढावा घेण्यासाठी आणि राज्य यंत्रणांशी समग्र समन्वय ठेवण्यासाठी सीपीसीबी मुख्यालयात  केंद्रीय नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, पथकांचे उत्तम  व्यवस्थापन आणि समन्वयासाठी जिल्हानिहाय नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत.

दिल्ली आणि एनसीआर प्रदेशातील हिवाळ्यात हवेची गुणवत्ता ही प्रमुख पर्यावरणीय समस्या आहे. या भागातील वायू गुणवत्ता व्यवस्थापनासाठी मागील पाच वर्षांपासून विविध प्रयत्न केले जात आहेत. हवेच्या गुणवत्तेत दरवर्षी थोडीथोडी सुधारणा दिसून आली असली तरी बरेच काही करण्याची गरज आहे.