दिल्लीतील चर्च पाडण्यास भाजप-आप जबाबदार, केजरीवाल खोटे बोलले : कॉंग्रेस

0
188
गोवा खबर : दिल्लीतील चर्च पाडण्यात भाजप व आप सरकार जबाबदार असुन, सदर धार्मिक स्थळ पाडण्यापुर्वी त्यांना साधी नोटिस देण्याचे सौजन्यही भाजप व आपने दाखविले नाही. भाजप व आप हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असुन, केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी धार्मिक कलह माजवुन समाजात फूट घालण्याचे काम हे दोन्ही पक्ष करीत आहेत. नवी दिल्लीत भाजप-आप सरकारने पाडलेल्या चर्च बद्दल आपणाला काहीच माहित नसल्यासारखे सांगणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल खोटे बोलले असा सणसणीत आरोप डॉ. शमा मोहम्मद यांनी केला आहे.
आज गोव्यात सदर चर्च जमीनदोस्त करण्याच्या कृतीवर भाष्य करताना आपच्या केजरीवालांनी ” तो मी नव्हेच” ची भूमीका घेण्याचा प्रयत्न केला. दिल्ली विकास प्राधिकरणात आपचे दोन न भाजपचा एक आमदार सदस्य असुन, भाजपचे तीन नगरसेवक सदर प्राधिकरणावर आहेत. या चर्च पाडण्याच्या कृत्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दोघेही जबाबदार आहेत असे डॉ. शमा मोहम्मद म्हणाल्या.
दिल्लीचे आपचे आमदार दिलीप पांडे व सोमनाथ भारती यांनी सदर धार्मिक स्थळ पाडले जात असताना केवळ बघ्याची भूमीका घेतली. भाजपचे आमदार ओ. पी. शर्मा यांनी ही मौन बाळगले असे डॉ. शमा मोहम्मद म्हणाल्या.
गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सदर चर्च पाडण्यास भाजप व आप जबाबदार असल्याचे सांगितले. या बेकायदेशीर व असंवेदनशील कृतीने भाजप-आपचे संबंध परत एकदा उघड झाल्याचे सांगीतले.
विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी दिल्लीतीच चर्च पाडण्याचा कृतीचा निषेध केला. गोमंतकीय आपचा बेगडी दिखावूपणा ओळखण्यासाठी हुशार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.