दिल्लीच्या प्रदूषणाला कंटाळून सोनिया,राहुल गांधी गोव्यात

0
435
गोवा खबर:दिल्ली मध्ये वाढत असलेले प्रदूषण कमी होण्याचे नाव घेत नसल्याने त्रस्त झालेल्या काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी डॉक्टरांच्या सल्ल्या नंतर आपले पुत्र राहुल गांधी यांच्या सोबत गोव्यात दाखल झाल्या आहेत.

दिल्ली मधील प्रदूषणाने कळस गाठला आहे.तेथील प्रदूषण सोनिया गांधी यांच्या प्रकृतीस मारक असल्याने त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्या नंतर पुत्र राहुल गांधी यांच्या सोबत शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास दाबोळी विमानतळावर दाखल झाल्या आहेत.
राहुल गांधी निळ्या रंगाच्या टीशर्ट आणि जीन्स मध्ये तर सोनिया गांधी करडया रंगाच्या टॉप आणि सलवारसह दोबोळी विमानतळा वरुन पांढऱ्या रंगाच्या पर्यटक परवाना असलेल्या बीएमडब्ल्यू मधून आपल्या मुक्कामी रवाना झाल्या.
सोनिया गांधी यांनी छातीच्या संसर्गाचा त्रास होत असल्याने त्यांनी दिल्ली मधील वाढत्या प्रदूषणा पासून दूर गोव्यातील स्वच्छ हवेत काही दिवस घालवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
सोनिया गांधी यांना यापूर्वी 30 जुलै रोजी दिल्ली येथील सर गंगाराम  हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.तेथून डिस्चार्ज मिळाल्या नंतर 12 सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांच्या सोबत नियमित तपासणीसाठी विदेशात गेल्या होत्या.त्यामुळे 14 ते 23 सप्टेंबर दरम्यान पार पडलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात देखील दोघांना सहभागी होता आले नव्हते.
डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये सोनिया गांधी आपल्या परिवारा सोबत काही दिवस गोव्यात निवांतपणे घालवण्यासाठी गोव्यात येत असतात.गेल्या वर्षी जानेवारी मध्ये 3 दिवसांच्या भेटीवर सोनिया गांधी गोव्यात दाखल झाल्या होत्या.त्यावेळी त्यांचा दक्षिण गोव्यातील एका पंचतारांकीत हॉटेलच्या परिसरात सायकल चालवातानाचा फोटो व्हायरल झाला होता.
वातावरणा बरोबर राजकारणात देखील प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोळसा आणि मोले अभयारण्यात होत असलेल्या प्रकल्पांवरुन गोव्यातील प्रदूषणाच्या मुद्द्यावर बोट ठेवले होते.त्यानंतर दिल्ली येथून परतल्या नंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्लीच्या प्रदूषणावर चिंता व्यक्त करत आधी त्याकडे लक्ष द्या,असा सल्ला केजरीवाल यांना दिला होता.या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी दिल्ली येथील प्रदूषणापासून दूर गोव्याच्या स्वच्छ हवेत काही दिवस घालवण्यासाठी आल्याने त्यांच्या दौऱ्याकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे.