दिगंबर कामत मुख्यमंत्री असताना केवळ भाजप व पर्रिकरांचे वाईट दिवस होते : अमरनाथ पणजीकर

0
295

 

गोवा खबर: गोव्यातील दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचे सरकार हे लोकाभिमूख होते. सन २००७ ते २०१२ च्या कार्यकाळात गोमंतकीय जनता सुखाने व आनंदाने नांदत होती. परंतु, सत्तेसाठी हपापलेला भाजप व स्व. मनोहर पर्रिकर हे मात्र दिगंबर कामतांचे सरकार उलथवुन टाकण्याचा केलेला प्रयत्न दोनदा फसल्याने दु:खी व त्रस्त होते असा जोरदार पलटवार कॉंग्रेसचे माध्यम विभाग अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या कार्यकाळात लोकांनी अत्यंत वाईट दिवस बघितले असे वक्तव्य काल केले होते त्याचा समाचार घेताना अमरनाथ पणजीकर यांनी भाजप सरकार त्यांच्या नाकर्तेपणाने लोकांचे हाल होत आहेत यावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी बेताल वक्तव्ये करीत असल्याचा आरोप केला आहे.
लोकशाही मार्गाने प्रशासन चालविणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे सरकार उलथवुन टाकण्याचा प्रयत्न सत्तेसाठी हपापलेल्या स्व. मनोहर पर्रिकरांनी दोनदा केला. सुदैवाने लोकांचा पाठिंबा व आशिर्वाद असल्यानेच दिगंबर कामत यांनी आपल्या सरकारची पाच वर्षे पुर्ण केली.
गोव्यातील तत्कालीन कॉंग्रेस सरकारने लोक भावनांचा आदर करुन सेझ रद्द केले. शैक्षणिक माध्यम ठरविण्याचा अधिकार विद्यार्थ्यांच्या पालकांना दिला. दिगंबर कामत सरकारने नेहमीच जनतेच्या संवेदना समजुन घेतल्या असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.
दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारने गोवा तियात्र अकादमीची स्थापना केली, गोवा व्हिजन -२०३५ अहवाल तयार केला, गोंयचे दायज योजना चालीस लावली, दक्षिण गोवा जिल्हाधीकारी कार्यालय संकुल बांधुन पुर्ण केले, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे काम सुरू केले, सेंट्रल लायब्ररी व संस्कृती भवन उभारले, नावेली येथे जिल्हा वाचनालय बांधले, सांकवाळ येथे कला भवन प्रकल्प उभारला असे अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले.
आमच्या सरकारानी गोव्यात युवकांना रोजगार संधी उपलब्ध करुन दिल्या. कला व संस्कृती क्षेत्राला प्रोत्साहन दिले. स्थानिक चित्रपट निर्मात्याने अर्थ सहाय्य दिले. परंतु, सन २०१२ पासुन संत्तेत आलेले भाजप सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे अशी टीका अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व त्यांचे चिअर लिडर्स भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे व सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी गोव्यातील भाजप सरकार हे आजपर्यंतचे सर्वात अपयशी सरकार असल्याचे ध्यानात ठेवावे असा टोला अमरनाथ पणजीकर यांनी हाणला आहे.
काल आणिबाणीचा मुद्दा उकरुन काढत लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपचा डाव दिगंबर कामत यांनी हाणुन पाडल्यानंतर वैफल्यग्रस्त झालेल्या मुख्यमंत्र्यांनी बेताल वक्तव्य करुन एका अर्थाने लोकांचे मनोरंजनच केले असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.