दाबोळी विमानतळावर 17 लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त; दोघे ताब्यात

0
2124
गोवा खबर: दुबईहून एअर इंडियाच्या विमानाने दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर शुक्रवारी  येथून बंगळुरला जाणार असलेल्या विमानातील एका प्रवाशाकडून १७ लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले.
दुबईहून प्रवास करणाऱ्या त्या प्रवाशाने  छोट्या शोभेच्या मूर्तीत ५८० ग्राम वजनाची पाच सोन्याची बिस्कीटे लपवून आणल्याचे कस्टम विभागाला तपासणीच्या दरम्यान आढळून आल्या नंतर ते सोने जप्त करण्यात आले.
दुबईहून दाबोळी विमानतळावर हे विमान पोचल्यानंतर गोव्यातून एक प्रवासी त्या विमानात चढला. हा प्रवासी ते सोने  बंगळुरला घेऊन उतरणार असल्याचे कस्टम विभागाच्या तपासणीत उघड झाल्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याशी चौकशी सुरु करण्यात आली.
नवीन वर्षाच्या पहील्याच दिवशी कस्टम विभागाने दाबोळी विमानतळावर एका प्रवाशाकडून १९ लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त केल्यानंतर आज पुन्हा कस्टम अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत १७ लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त करण्यात आले.
दुबईहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एअर इंडिया च्या ‘एआय-९९४’ विमानात एक प्रवासी तस्करीचे सोने घेऊन असल्याची माहीती पूर्वीच कस्टम अधिकाऱ्यांना मिळाली होती. हा प्रवासी गोव्यात न उतरता बंगळूरला उतरणार असल्याची माहीती अधिकाऱ्यांना उपलब्ध झाल्यानंतर दाबोळी विमानतळावर हे विमान पोचल्यानंतर त्यांनी विमानातील प्रवाशांची तपासणी करण्यास सुरवात केली.
तपासणीदरम्यान एका प्रवाशावर अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी  त्याच्या सामानाची तपासणी करण्यास सुरवात केली. तपासणीच्या वेळी त्यांना त्याच्या सामानातून एक शोभेची मूर्ती आढळली. त्या मूर्तीत पाच सोन्याची बिस्कीटे लपवण्यात आल्याचे उघड झाले. यानंतर त्या प्रवाशाला ताब्यात घेऊन तस्करीच्या प्रकाराबाबत त्याची चौकशी केली असता विमान दाबोळी येथे पोचल्यानंतर गोव्यातून एक प्रवासी विमानात चढून नंतर हे सोने तो बंगळुरला उतरवणार होता अशी माहीती त्यांनी कस्टम अधिकाऱ्यांना दिली. गोव्यात या विमानात चढलेल्या त्या प्रवाशाबाबत कस्टम विभागाला माहीती मिळाल्यानंतर त्यालाही  ताब्यात घेण्यात आले.
दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाचे कमिश्नर आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली उप कमिशनर डॉ. राघवेंद्रा पी व इतर अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेले हे १७ लाख रुपयांचे तस्करीचे सोने कुठे नेण्यात येत होते याबाबत कस्टम अधिकारी अधिक तपास करीत आहेत.