दहावीचा विक्रमी ९१.२७ टक्के निकाल

0
1503

गोवा खबर:गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10 वी परीक्षेचा निकाल 91.27 टक्के  लागला आहे. परीक्षेत मुलींची टक्केवारी 90.49 तर मुलांची 88.69 टक्के इतकी आहे. राज्यातील एकूण 390 पैकी  75  विद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. गेल्या सहा वर्षांत  निकालाच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत असून 2017 सालचा निकाल 91.57 टक्के इतका होता,  अशी माहिती  शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी शुक्रवारी पर्वरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

क्रीडा गुणांचा ३७६ जणांना प्रत्यक्ष लाभ 

एकूण ८४५१ विद्यार्थ्यांना क्रीडा गुण देण्यात आले. काही विषयांमध्ये नापास झाल्याने उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्यक्षात ३७६ जणांना या गुणांचा लाभ झाला. ही टक्केवारी ४.0४ टक्के इतकी आहे. विक्रमी निकालाची अनेक कारणे सांगितली जात आहेत. नॅशनल स्कीम क्वालिफाइड फ्रेमवर्क अभ्यासक्रम लागू केल्याने हे विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही सहा विषयात उत्तीर्ण झाले तरी उत्तीर्ण घोषित केले जाते. विक्रमी निकालाचे हे एक कारण आहेच शिवाय क्रीडा गुण, व्यावसायिकपूर्व विषय आणि विशेष गरजा असलेल्या मुलांना योग्य त्या सोयी सुविधा दिल्या हीदेखिल विक्रमी निकालाची कारणे असल्याचा दावा त्यांनी केला.

विशेष मुलांचीही उत्कृष्ट कामगिरी 

दिव्यांग विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी बजावली. अशा विद्यार्थ्यांसाठी असलेले पर्वरीचे संजय स्कूल, ढवळी व प्रियोळ येथील लोकविश्वासन प्रतिष्ठानचे स्कूल तसेच जुने गोवें येथील झेवियर अकादमी स्कूल या चारही विद्यालयांनी १00 टक्के निकाल प्राप्त केला.

१५ जूनपासून पुरवणी परीक्षा 

३३ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या आणि ‘सुधारणा हवी’ असा शेरा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी १५ जूनपासून पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी २९ मे ते ७ जून या कालावधीत केवळ आॅनलाइन अर्ज स्वीकारले जातील. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत आणि त्यांना गुणांमध्ये सुधारणा हवी असेल तर त्यांनीही ही परीक्षा देता येईल. रिव्हॅल्युएशनसाठी १ जूनपर्यंत, उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रतीसाठी ५ जूनपर्यंत तर व्हेरिफिकेशनसाठी २ जूनपर्यंत अर्ज सादर करता येतील.