दलित तरुणांच्या सक्षमीकरणासाठी  ‘डिक्की’चा ‘डीएआयसी’शी करार

0
1473

गोवा खबर: दलित (एससी, एसटी) समाजातील तरुणांच्या सक्षमीकरणासाठी  ‘डिक्की’ (दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज) आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयांतर्गत येणाऱ्या डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर (डीएआयसी) यांच्यामध्ये नुकताच येथे सामंजस्य करार झाला. ‘डिक्की’चे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे आणि ’डीएआयसी’चे संचालक अतुल देव यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत उपस्थित होते. 

दलित समाजातील उदयॊजकता, सक्षमीकरण, कौशल्य विकास, महिला आणि युवकांची क्षमताबांधणी, सरकारच्या विविध योजनांचा एससी आणि एसटी समाजाच्या आर्थिक-सामाजिक स्थितीवर होणारा परिणाम यांबाबत संशोधन करण्यासाठी ‘डिक्की’ आणि ‘डीएआयसी’ एकत्रित काम करणार असल्याबद्दल गेहलोत यांनी अभिनंदन केले.

देशभरातील दलित उद्योजकांना ‘डिक्की’ने एका छताखाली आणले असून, आपल्या सामाजिक आणि आर्थिक समस्यांवर उपाय म्हणून उद्योजकता विकासाला चालना देण्यासोबतच सध्याचे दलित उद्योजक आणि उद्योगोत्सुकांसाठी ‘डिक्की’ एकमेव स्रोत म्हणून काम करत आहे. तर ‘डीएआयसी’ ही संस्था आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी संशोधन करण्यासाठी केंद्राने स्थापन केली आहे. ‘डीएआयसी’ ला दलित उत्थानाचे आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘डिक्की’सारख्या संस्थांची गरज आहे. या सामंजस्य कराराद्वारे दलित समाज हा कितपत उद्योग-व्यवसायात आहे यावरही ‘डीएआयसी’ संशोधन करणार आहे.