दक्षिण गोव्यातून शिवसेनेतर्फे राखी नाईक यांनी सादर केला उमेदवारी अर्ज

0
850
गोवा खबर:शिवसेनेने गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा लढवण्याचे जाहीर केले होते मात्र आज उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी फक्त दक्षिण गोव्यातून राज्य उपाध्यक्ष राखी नाईक प्रभुदेसाई यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल केला.
 दक्षिण गोव्यात आतापर्यंत भाजपतर्फे नरेंद्र सावईकर, काँग्रेसच्यावतीने फ्रान्सिस सार्दीन, आपतर्फे एल्विस गोम्स, शिवसेनेतर्फे राखी प्रभुदेसाई, अपक्ष म्हणून मयूर खणकोणकर आणि निज गोयंकार रेव्हल्युशनरी फ्रंटतर्फे डॉ. कालिदास वायंगणकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. डमी उमेदवारी अर्ज मिळून एकूण पंधरा अर्ज दाखल झाले आहेत.
शुक्रवारी या अर्जाची छाननी केली जाणार आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी महादेव अरोंदेकर यांनी दिली आहे.
दक्षिण गोव्यात प्रचाराला जोरात सुरुवात झालेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा नारळ भाजपचे नरेंद्र सावईकर यांनी फोडला होता. त्यानंतर एक एप्रिल रोजी निज गोयंकार फ्रंटचे उमेदवार डॉ. कालिदास वायंगणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काँग्रेसचे फ्रान्सिस सर्दीन आणि आपचे एल्विस गोम्स यांनी दोन एप्रिल रोजी एकाच वेळी  उमेदवारी अर्ज भरले होते.
अपक्षांमधून मयूर खणकोणकर आणि शिवसेनेच्या राखी नाईक यांनी गुरुवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
 उपजिल्हाधिकारी महादेव अरोंदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, डमी अर्ज धरता दक्षिण गोव्यातून एकूण पंधरा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.  शुक्रवारी अर्जाची छाननी होणार आहे.