दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे काम मार्चमध्ये पुर्ण झाल्याचे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा  आरोग्यमंत्र्यानी उघड केला :जनार्दन भांडारी

0
586
गोवा खबर: गोव्यातील डाॅ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार केवळ खोटारडेपणा व लोकांची दीशाभूल करुन राज्य चालवत आहे. मार्च महिन्यात दक्षिण गोवा इस्पितळाचे काम पुर्ण झाल्याचे सांगुन खोटारडेपणा करणाऱ्या मुख्यमंत्री सावंतांचे बींग त्यांच्याच मंत्रीमंडळातील आरोग्यमंत्र्यानी फोडले आहे, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन भांडारी यांनी केली आहे. 
काल दक्षिण गोवा इस्पितळात भेट दिल्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सोमवार  ११ पासुन बाह्यरुग्ण सेवा नविन इस्पितळात सुरू करण्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी सदर इस्पितळाचे काम अजुनही अपुर्णावस्थेत असल्याचे स्पष्ट केल्याने मुख्यमंत्री डाॅ. सावंत यांनी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केलेली इस्पितळ पुर्णत्वाची घोषणा खोटी होती हेच दाखवुन दिले आहे. जनतेची दिशाभूल करणाऱ्या मुख्यमंत्र्यानी ताबडतोब जाहिर माफी मागावी, अशी मागणी जनार्दन भांडारी यांनी केली आहे.
दक्षिण गोव्यातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन, त्यांच्या सोयीसाठी काॅंग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दक्षिण गोवा जील्हा इस्पितळाचा प्रकल्प सुरू केला होता व सन २०१२ पर्यंत त्याचे जवळजवळ ६० टक्के बांधकाम पूर्ण केले होते. परंतु त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप सरकारने मागील ८ वर्षे हा प्रकल्प रखडत ठेवला.
दक्षिण गोवा जील्हाधीकारी कार्यालय प्रकल्पाचे बांधकाम माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या कारकिर्दीतच पूर्ण झाले होते. परंतु, भाजपने सत्तेत येताच त्याचे उद्घाटन करण्याचे श्रेय घेतले. उद्घाटनाला मडगावच्या आमदाराना साधे निमंत्रण सुद्धा देण्याचे सौजन्य भाजपने दाखवले नाही. आज नैसर्गिक न्यायाने भाजपला इस्पितळाचे गाजावाजा करून उद्घाटन करणे शक्य नाही. ज्या ध्येयाने  दिगंबर कामतांनी  इस्पितळ प्रकल्पाची पायाभरणी केली ते ध्येय आज पूर्ण होत आहे. ओपिडीत सोमवारी येणारे रुग्ण व डाॅक्टरच या प्रकल्पाचे उद्घाटन करतील याचा काॅंग्रेस पक्षाला खरा आनंद आहे.