दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ पुर्णपणे कार्यांवित करा:विरोधी पक्ष नेत्यांची राज्यपालांकडे मागणी

0
434
गोवा खबर : गोवा सरकारने दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ पुर्णपणे कार्यांवित करावे, सामुदायीक कोविड चाचणी हाती घ्यावी तसेच कोविड महामारी व अर्थव्यवस्था यावर त्वरित कृती आराखडा व श्वेतपत्रीका जाहिर करावी अशी  मागणी  करणारे व इतर विषय मांडणारे निवेदन विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी आज राज्यपाल सत्यपाल मलिक यांची राजभवनावर भेट घेऊन दिले.
सरकारने ताबडतोब व्हेंटिलेटर, यंत्र सामग्री तसेच कोविड रुग्णांसाठी आयसिएमआरने सांगातलेली औषधे यांचा योग्य पुरवठा ठेवणे गरजेचे आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात कोविड रुग्णांसाठी प्रशस्त व्यवस्था करणे सहज शक्य आहे व सरकारने राहिलेल्या कामासाठी पीएम कॅअर फंडातुन निधी आणावा असे  कामत यानी म्हटले आहे.
सामाजीक कोविड चाचणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे कोविडची लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधणे व त्यांचे विलगीकरण सोपे होईल व त्यामुळे रोगाचा फैलाव रोखणे शक्य होईल असे मत  कामत यानी व्यक्त केले आहे.
सरकारने कोविड हाताळणीत सर्वांना विश्वासात घेणे महत्वाचे आहे. आज कोविड इस्पितळ तसेच कोविड केअर सेंटरमध्ये अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे व त्याचे फोटो व व्हिडीओ समाज माध्यमांवर येत असल्याने लोकांच्या मनात भितीचे वातावरण आहे  हे  कामत यानी राज्यपालांच्या नजरेस आणुन दिले आहे. सरकारचे विवीध मंत्री व अधिकारी परस्पर विरोधी विधाने करतात व त्यामुळे लोकांच्या मनात अविश्वासाचे व गोंधळाचे वातावरण तयार होते असे कामत यानी राज्यपालाना सांगितले. सरकारचे व्यवस्थित धोरण नसल्याने कंटेनमेंट झोन्स तसेच प्रतिबंधीत क्षेत्रात लोक रस्त्यावर येतात. काही पंचायती गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांच्या विरुद्ध परस्पर लाॅकडाऊनचा आदेश देतात हे  कामत यानी राज्यपालांच्या लक्षात आणुन दिले. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत करणे सरकारची जबाबदारी असल्याचे  कामत यानी निवेदनात म्हटले आहे.
गोव्यात आज १४१७ कोविड रुग्ण असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते, परंतु या सर्व रुग्णाना विलगीकरण क्षेत्रात ठेवणे सरकारला जमलेले नाही व त्यामुळे अनेक कोविड रुग्ण आपल्या घरीच आहेत. सरकारने दक्षिण व उत्तर गोव्यात कोविड इस्पितळ सुरू करावे तसेच प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर स्थापन करावे अशी मागणी  कामत यानी केली आहे.

सरकारने खासगी इस्पितळातील अतिदक्षता विभागात २० टक्के खाटा कोविड रुग्णांसाठी आरक्षित करण्याचा आदेश त्वरित मागे घ्यावा अशी मागणी  कामत यानी केली आहे.
राज्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत असताना व कोरोनाचा फैलाव कानाकोपऱ्यात पोचलेला असताना, सरकारने शिक्षकाना शाळेत उपस्थित राहण्याचा काढलेला आदेश मागे घ्यावा असे सांगुन, सदर आदेश केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांच्या विरुद्ध असल्याचे  कामत यानी राज्यपालांच्या नजरेसमोर आणले आहे.
गोव्यात ॲानलाईन शिक्षणासाठी माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंह यानी गोव्याला भेट दिलेल्या  व आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत कार्यान्वित झालेल्या  इंट्रानेट सुविधेचा वापर करणे गरजेचे आहे असे  कामत यानी निवेदनात म्हटले आहे.
विरोधीपक्ष नेते दिगंबर कामत यानी राज्याची अर्थव्यवस्था व ढासळलेल्या अर्थव्यवस्थेस चालना देण्यासाठी सरकारने इकॉनोमिक रिव्हायवल प्लॅन अमलात आणावा अशी मागणी केली आहे.
विरोधी पक्ष नेत्यानी म्हादई, वास्को- लोंढा रेल्वे मार्गाचे दूपदरीकरण, रस्ता महामार्गाचे बांधकाम तसेच वीज वाहिनी टाकण्यासाठी मोले राष्ट्रीय उद्यान व महावीर अभयारण्य क्षेत्रातील झाडांची होणारी कत्तल तसेच करमल घाटातील महामार्गाच्या कामासाठी कापण्यात येणारी झाडे या सर्वांना लोकांचा होणारा विरोध  हे विषय राज्यपालांसमोर ठेवले आहेत.
सरकारने संजीवनी साखर कारखान्याच्या बाबतीतही सर्व शेतकऱ्यांना व ऊस उत्पादकांना विश्वासात  घ्यावे असे  कामत यानी निवेदनात म्हटले आहे.