त्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार

0
737

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि गोवा विद्यापीठ आयोजित राष्ट्रीय परिसंवादात मानवाधिकारांवर चर्चा

गोवा खबर:निसर्गाने प्रत्येक व्यक्तीला बरोबरीचे स्थान दिले आहे. जात, धर्म, वंश, लिंग अशा कोणत्याही आधारावर व्यक्ती-व्यक्तींमध्ये भेद करता येत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ ज्ञानेश्वर मुळे यांनी केले. ते आज राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि गोवा विद्यापीठ आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या उदघाटनाप्रसंगी बोलत होते. “विकासाची संकल्पना, वंचित समूह आणि मानवाधिकार”  या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. उदघाटनाप्रसंगी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सरचिटणीस जयदीप गोविंद, कुलगूरु डॉ वरुण साहनी, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातील सहायक संचालक के.पी.लाल, अवर सचिव संजय कुमार यांची उपस्थिती होती.

आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात मानवाधिकाराचे महत्त्व आहे. प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, हीच मानवाधिकाराची संकल्पना असल्याचे डॉ मुळे म्हणाले. ज्या देशांनी सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगती साधली आहे, त्या देशांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान आहे. त्यामुळे स्त्री-पुरुष समानता ही सुद्धा मानवाधिकारासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे. प्रत्येक समुदाय एलजीबीटी, वेश्याव्यवसायात अडकलेल्या महिला, कैदी, वेठबिगार यांच्या अधिकारासाठी मानवाधिकार आयोग झटत आहे. विविध विचारांना पुढे घेऊन जाण्याचा विचार म्हणजे मानवाधिकार, अशी व्याख्या त्यांनी सांगितली. आता, नव्या पिढीने पुढाकार घेऊन लोकशाहीचे तिन्ही आधारस्तंभ कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका मजबूत करण्याची आवश्यकता आहे. या तिन्हींमध्ये पारदर्शकता आणण्याची आवश्यकता आहे, असे डॉ मुळे पुढे म्हणाले.

मानवाधिकार ही संकल्पना आजच्या परिप्रेक्षात फार महत्वाची आहे, असे आयोगाचे सरचिटणीस जयदीप गोविंद म्हणाले. अनुसूचीत जाती/जमाती, आदिवासी, महिला यांच्या हितासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे वेळोवेळी विकासयोजना घेऊन येतात. विविध योजनांच्या माध्यमातून या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सुरु आहे, मात्र अजूनही यात बरेच काम बाकी आहे, असे जयदीप गोविंद म्हणाले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे आलेल्या प्रत्येक तक्रारीचा दखल घेऊन निराकरण केले जाते, असे त्यांनी सांगितले. आयोगाच्या आदेशांची शंभर टक्के अंमलबजावणी होत असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आता संकेतस्थळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचे प्रयत्न चालवले आहेत. www.nhrc.nic.in हे संकेतस्थळ तीन लाख सामुदायिक सेवा केंद्रांच्या माध्यमातून गावपातळीवर पोहचवले आहे. नागरिकांनी अतिशय सजग राहून त्यांना कुठे मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे आढळले तर तक्रार दाखल करण्याचे आवाहन जयदीप गोविंद यांनी केले.

दिवसभराच्या परिसंवादत सद्यपरिस्थितीत वंचित घटकांचे मानवाधिकार, वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासात माध्यमांची भूमिका या दोन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यात पुणे येथील प्रसिद्ध लेखक डॉ दामोदर खडसे, पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक विनोदकुमार डी व्ही, द हिंदू चे माजी पत्रकार तथा दिव्यांगांच्या कल्याणासाठी कार्य करणारे प्रकाश कामत, नया इंडियाचे संपादक अजित कुमार द्विवेदी,  दिल्ली दूरदर्शनचे ज्येष्ठ प्रतिनिधी डॉ ऊर्मिलेश भट्ट यांनी मार्गदर्शन केले.