त्या 13 आमदारांना काँग्रेसची दारे कायम बंद ; गोवा काँग्रेसच्या बैठकीत ठराव

0
1120
 गोवा खबर:काँग्रेस सोडून भाजप मध्ये गेलेल्या 13 आमदारांना पुन्हा केव्हाच काँग्रेस मध्ये घेतले जाऊ नये, असा ठराव आज  गोवा प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.हा ठराव अखिल भारतीय काँग्रेस समितीला पाठवून त्यावर शिकामोर्तब करून घेतले जाणार आहे.
प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारी समितीची उच्चस्तरीय बैठक आज प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत काँग्रेस सोडून गेलेल्या 13 आमदारांवर सविस्तर चर्चा झाली.13 आमदारांनी पक्षाचा आणि पक्षाला साथ देणाऱ्या मतदारांचा विश्वासघात केल्याने या सर्वांसाठी काँग्रेसची दारे कायमची बंद करण्याचा ठराव आजच्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आला.हा ठराव अखिल भारतीय काँग्रेस समितीला पाठवला जाणार आहे.
यापूर्वी दक्षिण गोवा काँग्रेस समिती, प्रदेश काँग्रेस समितीने अशाच आशयाचे ठराव मंजूर करून घेतले आहेत.
आजच्या बैठकीत माजी मंत्री एदूआर्द फालेरो, माजी खासदार रमाकांत आंगले, धर्मा चोडणकर,आग्नेल फर्नांडिस यांनी आपले विचार मांडले.
पक्षाची नव्या जोमाने बांधणी करण्यासाठी पुन्हा तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन डिजिटल सदस्य नोंदणी मोहिम राबवण्याचे देखील यावेळी ठरवण्यात आले.
दरम्यान प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या 10 आमदारां विरोधात विधानसभा सभापतीं समोर सादर केलेल्या अपात्रता याचिकेवर पहिली सुनावणी 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे.या सुनावणीकडे सगळ्याचे लक्ष लागून राहीले आहे.