त्या राडेबाज 15 पर्यटकांना 2 दिवसांची पोलिस कोठडी

0
868
गोवा खबर:तिवईवाडो-कळंगुट येथे स्थानिकांवर  खूनी हल्ला करणाऱ्या तेलंगणाच्या 15 पर्यटकांना आज न्यायलयात हजर केले असता त्यांना 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
 या पर्यटकांनी मद्यधुंद अवस्थेत केलेल्या राड्यात दोघे
 गंभीर जखमी तर दोघे किरकोळ जखमी झाले होते.कळंगुट पोलिसांनी याप्रकरणी तेलंगणाच्या 15 पर्यटकांना अटक केली होती. गंभीर जखमींवर बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार सुरु आहेत.
कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार,परवा रात्री उशिरा तीवईवाडो-कळंगुट येथील जुदे गेस्ट हाउस समोर हाणामारी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन तेथे मद्यधुंद होऊन स्थानीकांवर हल्ला करणाऱ्या संशयितांना घटना स्थळावरुन ताब्यात घेतले होते.या हाणामारी रेमी रिबेलो(हॉटेलचा रूम बॉय)आणि व्यवस्थापक अभिलाष पाटील हे किरकोळ जखमी झाले होते तर कळंगुट येथील राजू आणि सांगे येथील जयेश भंडारी हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. जयेश आणि राजूवर गोमेकॉमध्ये उपचार सुरु आहेत. रिबेलो याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तेलंगणाच्या 15 पर्यटकांना अटक केली. ही घटना परवा रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली होती.सर्व संशयितांना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.पोलिसांनी AP-29-V-7779 ही संशयितांनी वापरलेली बस देखील जप्त केली आहे.पोलिस उपनिरीक्षक कीर्तिदास गावडे हे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत.
स्थानिक आणि पर्यटकांमधील वाद वाढले
गोव्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचे स्थानिकांसोबत वाद हिंसक बनू लागले आहेत.या पूर्वी मरेशी येथे स्थानिक आणि पर्यटकांमध्ये हिंसक स्वरूपाची हाणामारी झाली होती.देशी पर्यटकांबरोबर विदेशी पर्यटकांशी स्थानिकांच्या संघर्षाचे प्रकार वाढले आहेत.विदेशी पर्यटक स्थानिकांशी स्पर्धा करून पर्यटन उद्योगात उतरु लागल्यामुळे देखील अनेकदा संघर्षाची ठिणगी उडू लागली आहे.