त्या बोगस पत्रका विरोधात पणजी भाजप मंडळाची पोलिसात तक्रार

0
579
 गोवा खबर: पणजी भाजप मंडळ अध्यक्षांच्या नावे भाजपच्या बोगस लेटरहेडवर पणजीच्या उमेदवारीवरुन फिरत असलेली पोस्ट बनावट आहे.भाजपच्या बनावट लेटरहेडचा वापर करून खोट्या पोस्ट पसरवणाऱ्यां विरोधात कारवाई करा अशी मागणी पणजी भाजप मंडळ अध्यक्ष दीपक म्हापसेकर यांनी आज पणजी पोलिस स्थानकात दाखल केलेल्या एका तक्रारी  मार्फत केली आहे.
दोषींना शोधून काढून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी म्हापसेकर यांनी तक्रारी द्वारे केली आहे.
भाजप मंडळ अध्यक्ष दीपक म्हापसेकर यांच्या सोबत पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते.पत्रकारांशी बोलताना कुंकळ्येकर म्हणाले,काँग्रेसला आपला पराभव दिसू लागल्याने त्यांच्याकडून असले प्रकार सुरु आहेत.भाजप जो निर्णय पणजीच्या उमेदवारी बाबत घेईल तो आम्हा सगळ्यांना मान्य असणार आहे.
पणजीच्या येऊ घेतलेल्या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री मनोहर पार्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे.उत्पल यांना उमेदवारी देऊन घराणेशाही जपल्यास त्याला विरोध केला जाइल अशा आशयाचे पत्रक काल सोशल मीडिया वरुन व्हायरल झाले होते.पणजी भाजप मंडळाने कालच त्याचे खंडन केले होते.आज पणजी भाजप मंडळाचे अध्यक्ष दीपक म्हापसेकर यांनी यासंदर्भात पणजी पोलिसात तक्रार दाखल करून दोषीवर कडक कारवाई करावी,अशी मागणी केली आहे.