तौत्के’चे गोव्यात थैमान : दोघांचा मृत्यू, शेकडो घरांवर झाडे पडून नुकसान

0
212
गोवा खबर : तौत्के चक्रीवादळाने गोव्यात घातलेल्या थैमानात दोघांचा बळी गेला असून करोडो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. शनिवारी सकाळ पासून सुरु झालेले तौत्केचे तांडव रविवारी रात्री उशिरा पर्यंत सुरु होते.
आप्तकालीन व्यवस्थापन यंत्रणा, पोलिस, प्रशासन, अग्निशामक दल आणि एनडीआरएफच्या पथकांमार्फत मदत आणि बचाव कार्य रविवारी दिवसभर सुरु होते.
सध्या कोविडचा फैलाव रोखण्यासाठी राज्यव्यापी कर्फ्यू सुरु असल्याने रस्त्यावर वर्दळ नसल्याने फार नुकसान झाले नसले तरी दुचकीवरुन जाणाऱ्या तरुणावर वीजेचा खांब आणि पेडणे तालुक्यात विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या युवतीवर माड पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
तौत्के चक्रीवादळ गोव्याच्या किनारी भागाला समांतरपणे पुढे गेले असले तरीही यामुळे गोव्यातील दोन्ही जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले. उत्तर गोव्यात एका युवतीवर माड पडल्याने तर दक्षिण गोव्यात चालत्या दुचाकीवर वीजेचा खांब कोसळल्याने इस्पितळात नेत असताना एकाचा मृत्यू झाला. 100 हून अधिक घरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान तेवढ्याच घरांचे थोड्या कमी प्रमाणात नुकसान झाले. तसेच 500 विविध ठिकाणी झाडे पडल्यामुळे रस्ते बंद झाले. तसेच वीज खात्यांचे मोठे नुकसान झाले असून वीज पुरवठा खंडित झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज दिली.
पणजीत ‘महालक्ष्मी’ निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ सावंत म्हणाले, राष्ट्रीय हवामान खात्याच्या गोवा विभागाने तीन दिवस आधी वादळाची पूर्व कल्पना दिली होती. त्यामुळे ‘तौत्के’ वादळाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील मच्छीमार, वीज, बंदर कप्तान, अग्नीशमन दलांना सतर्क करण्यात आले होते. त्यामुळे आज वादळामुळे निर्माण झालेली स्थीती नियंत्रणात आणण्यासाठी मोठी मदत झाली. वीज पुरवठा राज्य भरात खंडीत झाला आहे. त्यामुळे तो सुरळीत व्हायला दोन दिवस लागतील. याचा कोविड इस्पितळातील वीज पुरवठ्यावर काही परिणाम झालेला नाही. कारण तेथे अगोदरच बॅकअप ठेवण्यात आले होते. सुमारे 500 हुन अधिक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक अडथळा निर्माण झाला आहे. परंतु, रस्ते मोकळे करण्यात येत आहे. प्रथम मुख्य रस्ते मोकळे केले जातील. तसेच लोकांनी शक्य तेथे सहकार्य करावे आणि संयम राखावा, असेही आवाहनही त्यांनी केले.
चक्रीवादळात बळी पडलेल्याना तसेच ज्यांचे नुकसान झाले आहे, अशांना डिझास्टर रिलीफ फंडातून मदत केली जाणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, पुढील दोन दिवस असेच वातावरण राहणार आहे. त्यामुळे लोकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल, नौसेना हेही जनजीवन सुरळीत करण्यासाठी झटत आहेत.
वादळामुळे बांबोळी येथील सुपरस्पेशालीट ब्लॉक मध्ये पावसाचे पाणी शिरले मात्र त्यावर तत्काळ नियंत्रण आणण्यात आले. तसेच ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम या कोविड केअर सेंटरचे काही प्रमाणात नुकसान झाले. आज जे शक्य होते करण्यात आले‌ तर उर्वरित काम सार्वजनिक बांधकाम खाते सकाळी करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
राजधानी पणजीत ठीकठिकाणी झाडे पडून घरांचे आणि गाडयांचे मोठे नुकसान झाले. मळा भागात घरा घरात पाणी शिरुन मोठे नुकसान झाले आहे. कॉर्तीन रस्ता आणि पाटो परिसरातील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले होते.
शनिवारी दिवसभर समुदात मोठ्या लाटा उसळत होत्या. अनेक ठिकाणी किनारी भागात पाणी शिरल्याने मच्छीमारांच्या बोटी आणि झोपडयांचे नुकसान झाले होते. समुद्र खवळला असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.