तेवा फार्माच्या त्या कामगारांना परत कामावर न घेतल्यास तीव्र आंदोलन : शिवसेना

0
271
गोवा खबर : गेल्या अनेक वर्षांपासून काम करित असलेल्या बहुतांश कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कामावरून काढून टाकलेल्या कामगारांना  कामावर रुजू करून घ्यावे यासाठी शिवसेना पक्षाच्या कामगार विभाग असलेल्या भारतीय कामगार सेनेच्या वतीने गोव्यातील वेर्णा येथील तेवा फार्मा कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन सुरु केले आहे.
अनेक वर्षापासून पगारामध्ये होत असलेली तफावत, नोकरीची असुरक्षितता, कामादरम्यान केले जाणारे दबावतंत्र, सुविधांचा अभाव तसेच व्यवस्थापनाने निलंबन केलेल्या कामगारांना  न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे. शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी सरचिटणीस मिलिंद गावस, उत्तर जिल्हा प्रमुख सुशांत पावसकर, मुरगाव तालुका प्रमुख दिपक येरम, महेश पेडणेकर आणि इतर शिवसैनिकांबरोबर आंदोलन स्थळी सर्व कामगारांची भेट घेतली.
कामगार सेनेचे गोवा राज्य संघटक शंकर पंडित, संघटना अध्यक्ष विनायक पाटील, उपाध्यक्ष मेघश्याम निकम, सेक्रेटरी विठ्ठल पाटील सर्व कमिटी सभासद उपस्थित होते.
 कारण न देता काही कामगारांना कामावरून अचानक काढून टाकण्यात आल्याच्या कृतीचा राज्य प्रमुख कामत यांनी निषेध व्यक्त केला. कामगार सेना ही शिवसेनेचे बलस्थान असुन कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. कामावरून काढून टाकण्यात आलेल्या कामगारांना परत रूजू न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कामत यांनी दिला आहे.
भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस आणि शिवसेनेचे उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांनी याविषयामध्ये लक्ष देऊन त्वरित तोडगा काढण्याची मागणी गोवा सरकारकडे पत्राद्वारे केली आहे.
कोरोनाच्या महामारीत कामगारांना कामावरून काढू नका असे राज्य व केंद्र शासनाचे आदेश असतानादेखील या आदेशांना केराची टोपली दाखवीत अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता या कामगारांना कामावरून काढल्यामुळे त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.