तेजस’च्या प्रवाशांना उकडीच्या मोदकाचा प्रसाद ?

0
1156

गणेशोत्सवाच्या कालावधीत तेजस एक्स्प्रेसमधून जाणाऱ्या प्रवाशांना प्रसाद म्हणून उकडीचे मोदक देण्याचा विचार इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) सुरू आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर लगेचच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

सीएसएमटी ते करमाळीपर्यंत धावणारी तेजस एक्स्प्रेस एप्रिलपासून चालविण्यात येत आहे. आरामदायी, नव्या सुविधांनी सज्ज असलेल्या तेजस एक्स्प्रेसमध्ये आयआरसीटीसीतर्फे खाद्यपदार्थ पुरविले जातात. गणेशोत्सवाच्या १० दिवसांच्या कालावधीत प्रवाशांना उकडीचे मोदक देण्यात येण्याचा विचार प्रामुख्याने सुरू आहे. मात्र, त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे महामंडळातील सूत्रांनी सांगितले.

गतवर्षी मुंबई-दिल्ली मार्गावरील राजधानी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना गणेशोत्सवादरम्यान उकडीच्या मोदकांची मेजवानी देण्यात आली होती. प्रवाशांनी त्याचे कौतुक केल्याने महामंडळाचा हा प्रयोग यशस्वी ठरला होता. महामंडळातर्फे साधारणपणे सण-उत्सवांच्या काळात पेढा, जिलेबींसह गोड पदार्थांची मेजवानी दिली जाते. त्याच पद्धतीने मोदकांचा प्रसाद देण्याचा बेत आहे.