तीन दिवसीय किनारी कृषी मेळाव्याचे उदघाटन 

0
1590
गोवा खबर:ओल्ड गोवा स्थित भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या आवारात आज तीन दिवसीय किनारी कृषी मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. भारत सरकारच्या कृषी संशोधन व शिक्षण विभागाचे सचिव तसेच भारतीय कृषी संशोधन संस्थेचे महानिदेशक डॉ. त्रिलोचन महापात्रा यांच्या हस्ते या मेळाव्याचे उदघाटन झाले. यावेळी नव्याने बांधलेल्या ‘डॉ. ए. आर. भट्टाचार्य कृषी प्रदर्शन सभागृहा’चे देखील उदघाटन करण्यात आले. 
किनारपट्टीतील शेतकऱ्यांना शेती तसेच शेतीपूरक व्यवसाय-तंत्रज्ञान यांची माहिती यामधून व्हावी, असा या मेळाव्याचा उद्देश आहे. या मेळाव्यामध्ये एकूण ११८ कृषी विषयक गोष्टींचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये शेती उत्पादने जसे कि भाज्या, फळे, कडधान्ये, संशोधित बियाणे, तसेच या सर्वांच्या संशोधित, नवीन जाती यांची मांडणी करण्यात अली आहे. सोबतच शेतीपूरक व्यवसायांशी संबंधित माहितीचे सचित्र व उत्पादनांसह प्रदर्शन करण्यात आले आहे; जसे कि कुक्कुटपालन व्यवसायाचे मार्गदर्शन करण्यासाठी विविध पक्षी व त्यांची अंडी यांचे प्रदर्शन सदर मेळाव्यात करण्यात आले आहे. याशिवाय मत्स्यव्यवसाय, बागकाम व शेती साहित्य देखील येथे पाहण्यास व विक्रीस उपलब्ध आहे.
प्रदर्शन पाहण्यास शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला शेतकरी, शेती अभ्यासक, अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. ४ मार्च पर्यंत राज्यातील नागरिकांनी या मेळाव्याला भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय कृषी संशोधन संस्था, ओल्ड गोवा यांनी केले आहे.