तिसरी अशिया कप आंतरराष्ट्रीय ब्रिज स्पर्धा होणार गोव्यात

0
3732

 

 

 गोवा खबर : तिसरी अशिया कप आंतरराष्ट्रीय ब्रिज स्पर्धेचे यजमानपद भारत भूषवत असून ४ ते १० जून दरम्यान गोव्यातील मेरियट रिसॉर्ट अँड स्पा मध्ये ही स्पर्धा खळवली जाणार आहे. पुरुष, महिला, मिश्र, सुपर-मिक्स्ड आणि ज्येष्ठ अशा पाच खेळाडू गटांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलिया, बांगला देश, चीन, चीन-हाँगकाँग, चायनीज तैपैई, इंडोनेशिया, जपान, कोरिया, पाकिस्तान, सिंगापूर आणि थायलंड या देशांसह श्रीलंका व यजमान देश भारतातील आमंत्रित खेळाडूंचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटन जागतिक ब्रिज महासंघाचे अध्यक्ष श्री. जियानारिगो रोना यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जागतिक ब्रिज महासंघाच्या विभाग ४ आणि विभाग ६चे अध्यक्ष अनुक्रमे अशिया आणि मध्य-पूर्व ब्रिज महासंघाचे (बीएफएएमई) अशोक गोयल आणि अशियाई-प्रशांत ब्रिज महासंघाचे (एपीबीएफ) कुनिंग इस्थर शोडशॉय सोफोनपानिश यांचीही उपस्थिती राहणार आहे.

५ ते ८ जून दरम्यान पात्रता फेरी (राउंड रॉबिन) खेळवली जाणार आहे. प्रत्येक गटातील चार सर्वोत्तम संघ नॉक-आउट फेरीसाठी निवडले जाणार आहेत. ९ जून रोजी उपांत्यफेरी आणि १० जून रोजी अंतिम सामन्यासह तिसऱ्या स्थानासाठीचा सामना होणार आहे. ९ व १० जून रोजी मॅच पॉइंट जोडी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून यामध्ये अनेक भारतीय खेळाडूंनाही संधी मिळणार आहे.

बीएफआयच्या या प्रयत्नांना केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री कर्नल राजवर्धन सिंह राठोड एव्हीएसएम यांचेही पाठबळ मिळालेले आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणासमवेत क्रीडा मंत्रालयाने महासंघाच्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनामध्ये सहकार्य केले असून भारतात तसेच विदेशांतील स्पर्धांमध्ये सहभागासाठी आर्थिक साह्यही दिले आहे.

मंत्रीमहोदयांनी भारतामध्ये, विशेषतः युवा पिढीमध्ये, ब्रिज खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध शहरांमध्ये ब्रिज अकादमी सुरू करण्याची सूचना केली आहे. खेळातून मानसिक ताण हलका करता येतो यामुळे त्यांनी ही सूचना केली आहे. ब्रिज हा खेळ बौद्धिक खेळ मानला जातो. यामुळे मन चौकस व संतुलित राहण्यास मदत होते. जलद निर्णय घेणे, तणावाखालीही कार्य करत राहणे यासाठी हा खेळ आपणास मानसिकदृष्ट्या सक्षम करतो. मंत्रीमहोदय पुढे म्हणतात की, आजच्या धकाधकीच्या जीवनात मनावरचा ताणतणाव हलका करण्यासाठी ब्रिजसारख्या खेळाला प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. आजच्या मुलांवरही लहान वयापासूनच मोठा ताण असल्याने त्यांनाही या खेळाकडे वळवणे महत्त्वाचे राहणार आहे. यासाठी ब्रिज अकादमीच्या माध्यमातून युवा व बालपिढीला या खेळाकडे आकर्षित करून त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन स्पर्धेसाठी तयार केल्यानंतर शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातूनही या खेळाचा प्रसार करता येईल.

इतर खेळांमध्येही सर्वोच्च स्तरावरील खेळांडूनासाठी ब्रिज हा खेळ उपयुक्त ठरतो, कारण अती तणावाखाली खेळतानाही सर्वोत्तम कामगिरी साध्य करण्याची तयारी ब्रिजमधून करता येते. ब्रिजच्या टेबलवर जलदगतीने निर्णय घेण्याचे कसब आणि निर्धारित चाली खेळण्याचे कसब जगभरातील अनेक उद्योजक, व्यावसायिकांना त्यांच्या उद्योगाच्या दैनंदिन व्यवहारांमध्ये लाभदायक ठरत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जगातील सर्वाधिक श्रीमंत अशा दोन व्यक्ती, त्या म्हणजे बिल गेट्स आणि वॉरन बफे.  या दोघांनाही ब्रिज खेळ आवडतो.

 

श्री. वॉरन बफे म्हणतात, “ब्रिज खेळल्यामुळे सर्वोत्तम मानसिक व बौद्धिक सराव होतो. दर दहा मिनिटांनी तुम्ही नव्या परिस्थितीला सामोरे जाता. ब्रिजमध्ये आपल्या सहकाऱ्याकडूनही सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याची जबाबदारी आपणास पेलावी लागते. उद्योग-व्यवसायामध्ये आपले व्यवस्थापक, कर्मचारी यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आपणास प्रयत्न करावे लागत असतात. म्हणूनच ब्रिज हा असा आकर्षक खेळ असल्याने अगदी तुरुंगातही ब्रिज खेळण्यास सक्षम असलेल्या तीन कैद्यांसमवेतही मला हा खेळ खेळण्यास आवडेल.”

मंत्रीमहोदयांना अशी अपेक्षा आहे की, अशियाही स्पर्धांचे भारतात आयोजन केल्याने भारतातील ब्रिज खेळाच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून केवळ पत्त्यांचा एक खेळ म्हणून या खेळाकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलण्यास चालना मिळेल. मंत्रीमहोदयांच्या मार्गदर्शनानुसार, भारतामध्ये ब्रिज खेळाचा विकास व प्रसार होईल असा बीएफआयला विश्वास आहे. गोव्यामध्ये आयोजित तिसऱ्या अशिया कप ब्रिज स्पर्धेला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद लाभेल अशी अपेक्षा बीएफआयने बाळगली आहे.

येत्या ऑगस्टमध्ये जकार्ता-पालेमबँगमद्ये होणाऱ्या १८व्या अशियाई क्रीडास्पर्धेतही ब्रिज खेळाचा समावेश आहे. या खेळामध्ये तीन श्रेणींत प्रत्येकी तीन अशी एकूण ६ पदके दिली जाणार आहेत. क्रीडा इतिहासात प्रथमच बहु-राष्ट्रीय, बहु-क्रीडा प्रकारांमधील स्पर्धेत अशा प्रकारच्या मानसिक कौशल्याचे दर्शन घडवणाऱ्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे.

जागतिक ब्रिज महासंघाद्वारे दरवर्षी विविध प्रकारांमध्ये जागतिक स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदाची जागतिक ब्रिज मालिका ओरलँडो, फ्लोरिडा येथे २१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या काळात आयोजित करण्यात आली आहे. तर ८ ते १८ गस्ट दरम्यान वुजियांग-चीन येथे १७वी जागतिक युवा संघ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारतही सहभागी होत आहे.

गोव्यात होणाऱ्या स्पर्धेचे स्थळ पुरस्कर्ते गोवा मेरियॉट रिसॉर्ट अँड स्पाने या स्पर्धेत प्रथमच समाविष्ट केलेल्या ज्येष्ठ संघ प्रकारातील विजेत्याला विशेष चषक देण्याचा निर्णय घेतला असून याचे गोवा मेरियॉट सिनिअर टीम्स कप असे नामकरण करण्यात आले आहे.

 

Websites:

Championship: www.asiabridgecup.com

WBF: www.worldbridge.com

BFI: www.bfi.net.in

APBF: www.pabf.org

BFAME: www.bridgewebs.com/bfame/

Youth Bridge: www.youth.worldbridge.org