तिसरा आंतरराष्ट्रीय फॅशन सप्ताह होणार गोव्यात

0
974

गोवाखबर :भविष्यातील फॅशनची परिभाषा बनवणे आणि जागतिक फॅशनच्या दुनियेमध्ये भारताचा सहभाग वाढवणे या
उद्देशाने वाइल्ड ऑर्किड एंटरटेनमेंट्सच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय फॅशन वीकचे आयोजन केले जाते. तिसरा
आंतरराष्ट्रीय फॅशन सप्ताह (आयएफडब्लू-२०१८) येत्या २ मार्च ते ४ मार्च २०१८ या कालावधीत ताज विवांता-
पणजी येथे आयोजित करण्यात आला आहे.बेटी बचाओ और बेटी पढाओ या प्रकल्पास या उपक्रमातून प्रोत्साहन
दिले जात असून यासाठी या फॅशन शोमध्ये खास कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येणार आहे.
या तीनदिवसीय फॅशन सप्ताहामद्ये भारतभरातून १८ फॅशन डिझायनर सहभागी होत आहेत. यामध्ये सेलेब्रिटी
डिझायनर मोहन गोवडा, नवीन प्रदीप, मधु वर्मा यांच्यासह गोमंतकीय डिझायनर फिलू मार्टिन, अनुष्का शेख,
पूजा मापसेकर आणि अनेक उभरते फॅशन डिझायनर यांचा समावेश आहे. त्याचबरोबर वस्त्रा डिझायनिंग-पुणे,
नाशिकची डीआयडीटी, गोवा पॉलिटेक्निक कॉलेज अशा फॅशन इन्स्टिट्यबटही सहभागी होत आहेत.
आयएफडब्लू गोवाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विल्यम झेवियर म्हणाले, आयएफडब्लूच्या पहिला दोन्ही
उपक्रमांना फॅशन डिझायनरकडून चांगला प्रतिसाद व सहभाग मिळाला होता. त्यामुळे आयएफडब्लू-२०१८ या
तिसऱ्या उपक्रमाचे आयोजन करताना आम्हाला आनंद होत आहे. यंदाचा उपक्रम भव्य असेल. यामध्ये काही
नामांकित डिझायनर आपले समर कलेक्शन सादर करणार आहेत. तसेच ४५हून अधिक मॉडेल, सेलिब्रिटी रॅम्पवर
विविध फॅशन प्रकार सादर करणार आहेत.
या उपक्रमाचे प्रमुख आकर्षण विविध सेलिब्रिटी असणार आहेत. यामध्ये बॉलिवुड सेलिब्रिटी राखी सावंत, राही
खान, महेक शर्मा, मिस्टी मुखर्जी, राहुल कपूर तसेच अनेक प्रादेशिक सिनेजगतातील सेलिब्रिटींचा समावेश असेल.
हा तीन दिवसीय उपक्रम सकाळी १० ते रात्री ११.३० या वेळेत होणार आहे. या दरम्यान मास्टर क्लास, परिसंवाद,
चर्चासत्रे, सौंदर्य उपक्रमांसाठी ऑडिशन व कार्यशाळा असे कार्यक्रम होणार आहेत. डिझायनर्स फॅशन शो सायंकाळी
६ पासून सुरू होणार आहेत. तर लाइफस्टाइल फॅशनेबल उत्पादनांसाठी १० ते रात्री ११.३० या वेळेत आयोजित
पॉप-अप शॉपिंग गॅलरी प्रमुख आकर्षण राहणार आहे.
आयएफडब्लू गोवाच्या या तिसऱ्या महोत्सवास विविध व्यावसायिक हस्ती, फॅशन जगतातील नामांकित हस्ती,
सिनेजगतातील मान्यवर व विविध क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थिती लावणार आहेत.