ताळगाव येथील सरकारी प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक उपक्रमाची सुरूवात

0
2715

 गोवा खबर:ताळगाव येथील सरकारी प्राथमिक विद्यालयात आज  खुशालभरीत शिक्षण या नवीन शैक्षणिक उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. मुख्यमंत्री  मनोहर पर्रीकर यांनी २०१७ साली ही शाळा दत्तक घेतली आणि एक आदर्श शाळा करण्याच्या दृष्टीने काम सुरू केले होते. नवीन शैक्षणिक उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून धेंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष  श्रीनिवास धेंपे उपस्थित होते.

शिक्षण खात्याचे संचालक  नागराज होन्नेकरी यांनी यावेळी सांगितले की, सरकार मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विशेष लक्ष देत आहे. आज पुस्तकांची जागा टॅब आणि संगणकाने घेतलेली आहे. सरकारही अशा माध्यमातून मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे.  गोव्यातील शाळांमधून दर्जेदार शिक्षण देणो हे सरकारचे ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणार्‍या धेंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष  श्रीनिवास धेंपे यांनी पालकांनी आपल्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे असे सांगताना विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करून जीवनात यशस्वी होण्याबरोबरच आपल्या पालकांचे नावही उज्वल करण्याचा सल्ला दिला.

मुख्यमंत्र्याच्या विशेष अधिकारी रूक्मा सडेकर यांनी शाळेत सुरू केलेल्या स्मार्ट क्लासरूम, वाचनालय आदि वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. सडेकर यांनी शाळेत प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या खुशालभरीत शिक्षण उपक्रमाची माहिती देऊन हा उपक्रम इतर शाळांनीही लागू केला जाईल असल्याचे सांगितले.

 यावेळी तिसवाडी तालुक्याचे सहाय्यक जिल्हा शिक्षण निरिक्षक शेख नुरूद्दीन, शिक्षण खात्याचे उपसंचालक श्री. डी. आर. भगत, शिक्षिका सुरेखा वायंगणकर आदि मान्यवर उपस्थित होते.