तांत्रिक बिघाडा नंतर दाबोळीवर एअर एशियाच्या विमानाचे इमर्जन्सी लैंडिंग

0
1006
 गोवा खबर :दाबोळी विमानतळावरून १६८ प्रवाशांना घेऊन बंगळूरकडे रवाना झालेल्या एअर एशिया विमानात आज सकाळी तांत्रिक बिघाड आल्याने हे विमान त्वरित पुन्हा दाबोळी विमानतळावर उतरवावे लागले. विमानाच्या मागच्या बाजूला असलेल्या चाकांच्या हायड्रोलीक सिस्टीम मध्ये बिघाड झाल्याचे वैमानिकाला समजल्या नंतर त्यांनी १० मिनिटांच्या आत विमान  दाबोळी विमानतळावर उतरवले.
आज  सकाळी ७.३५ च्या सुमारास ही घटना घडली. एअर एशियाचे ‘आय ५१३२’ या विमानाने दाबोळी विमानतळावरून बंगळुरला जाण्यासाठी उड्डाण घेतल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाला असल्याचे वैमानिकाला आढळून आल्यानंतर विमान पुन्हा दाबोळी विमानतळावर उतरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.एअर एशियाच्या वैमानिकाने  याबाबत दाबोळी विमानतळावरील संबंधित अधिकाऱ्यांना  माहीती देऊन पुन्हा विमान उतरवण्यासाठी परवानगी घेतली.त्यानंतर १० मिनिटात विमान रनवे वर सुरक्षित  उतरवण्यात आले. एअर एशिया विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान दाबोळी विमानतळावर उतरवण्याची या आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याचे सांगितले जात आहे.
या विमानातील १६९ प्रवाशांना बंगळूरला जाणाऱ्या अन्य विमानांमध्ये सोय करण्यात आली.