तर पणजी मधील स्मार्ट सिटीची कामे बंद पाडू : महापौर मडकईकर यांचा इशारा

0
771
गोवा खबर:स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत पणजी शहरात केल्या जाणाऱ्या कामांबाबत महानगर पालिकेला विश्वासात घेतले जात नाही,असा आरोप पणजी महानगर पालिकेचे महापौर उदय मडकईकर यांनी केला आहे.
पणजी शहरात ठीकठिकाणी रस्ते खोदण्यात आले असून त्यांची कामे वेळेत झाली नाही तर पावसाळ्यात शहरात पाणी  तुंबण्याची भीती व्यक्त करत मडकईकर यांनी स्मार्ट सीटी प्रकल्पाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत पणजी शहरात सुरु असलेल्या कामांची यादी पणजी मनपाला  त्वरित न मिळाल्यास पुढच्या आठवडयापासून ही कामे बंद पाडली जातील,असा इशारा महापौर मडकईकर यांनी दिला आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सीईओ चौधरी यांनी आपण पाठवलेल्या पत्राला केराची टोपली दाखवण्याची भाषा केली असल्याचे सांगून महापौर मडकईकर म्हणाले, त्यांनी माझा वैयक्तिक नव्हे तर महापौराच्या खुर्चीचा,पणजीवासियांचा अपमान केला आहे त्यामुळे त्यांनी पणजीवासियांची माफी मागायला हवी.पणजी महानगर पालिकेवर जसा आयएएस अधिकारी नेमला जातो तसाच अधिकारी स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी नेमावा,अशी मागणी देखील मडकईकर यांनी केली.