तज्ञांच्या सल्ल्याने परिक्षे ऐवजी वेगळा पर्याय काढा:विरोधी पक्षनेत्यांची मागणी

0
467
गोवा खबर:गोवा सरकारने कोरोनाच्या वातावरणात दहावी व बारावी परीक्षा घेण्याचा निर्णय बदलुन गोवा शालांत मंडळाला शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेऊन परीक्षा घेण्या ऐवजी  वेगळा पर्याय काढण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे.

कामत म्हणाले,कोविडचा फैलाव रोखण्यासाठी देशव्यापी लाॅकडाऊन जाहिर झाल्यानंतर बारावीचे दोन पेपर तसेच दहावीची संपुर्ण परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. सरकारने आता या परिक्षा २०-२१ मे पासुन घेण्याचे ठरविले आहे, परंतु कोरोनाच्या वातावरणांत विद्यार्थी सदर परीक्षा देण्यास मानसीक दृष्ट्या तयार नसल्याचे अनेक पालक, शिक्षक तसेच समाजसेवी संस्थाच्या प्रतिनीधीनी माझ्या लक्षात आणुन दिले आहे.
दहावी परीक्षेसाठी सुमारे अठरा हजार विद्यार्थी बसणार असुन, कोरोनाचे निर्बंध पाळताना, व्यक्तिगत अंतर ठेवणे बंघनकारक असल्याने, एका वर्गात केवळ ८ ते १० विद्यार्थी बसु शकतील अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यामुळे सुमारे १८०० वर्गांची गरज भासणार असुन, आजच्या घडीला सरकारकडे एवढी साधन सुविधा उपलब्द नाही हे स्पष्ट आहे. उकाड्याचे दिवस असल्याने वर्गात पंखे असणे गरजेचे आहे. अतिरीक्त आसन व्यवस्थेसीठी नविन शाळात परीक्षा घेण्याचे जर सरकारने ठरविले असेल तर त्या शाळांमध्ये स्वच्छतागृहांची सोय आहे का व इतर साधनसुविधा उपलब्द आहे का हे बघणे महत्वाचे आहे,याकडे कामत यांनी लक्ष वेधले.
आज दहावी-बारावीचे सुमारे २०० विद्यार्थी गोव्याबाहेर असुन, त्यांना परत येण्यासाठी वाहतुक व्यवस्था नसल्याने त्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे,असे सांगून कामत म्हणाले, त्याना परत आल्यानंतर क्वारंटाइन व्हावे लागल्यास परीक्षेला बसणे शक्य होणार नाही.
कामत म्हणाले,कोवीडच्या वातावरणात परीक्षेला मुलांना बोलवणे म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळण्यासारखेच आहे. परीक्षेच्या दिवसांत प्रत्येक मुलाला सोडण्यासाठी पालक आले तर सगळीकडे गोंधळ व गर्दी वाढेल हे सरकारने लक्षात ठेवावे.
गोवा हेडमास्टर संघटना व बिगर सरकारी संस्था तसेच समाजसेवी संस्थाचे प्रतिनीधी, शिक्षक व विद्यार्थी यांनी परीक्षेच्या ऐवजी वेगळा पर्याय काढण्याची जी मागणी केली आहे ती सरकारने मान्य करावी. शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्यावा,असे मत कामत यांनी व्यक्त केले आहे.