तंबाखू खावून थूंकणाऱ्या दुकानदारांच्या दुकानांना मनपा तर्फे टाळे

0
132
 गोवा खबर:राजधानी पणजी मधील मनपा मार्केट मध्ये तंबाखू पान खावून थूंकून घाण  करणाऱ्या पन्नास दुकानदारांना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडील तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. तसेच अनेकदा सांगून देखील त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे त्यांच्या दुकानांना टाळे ठोकण्या बरोबरच दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.
लॉकडाऊन मध्ये शिथिलता मिळाल्या नंतर पणजी मनपाने मार्केट सुरु करण्यापूर्वी त्याचे सॅनिटायझेशन आणि तंबाखू खावून खराब केलेल्या भिंती,खांब आदींची रंगरंगोटी करून घेतली होती.मात्र मार्केट सुरु झाल्या नंतर काही दिवसातच मार्केट मधील भिंती पुन्हा तंबाखू खावून थूंकणाऱ्यांनी रंगवल्याची गंभीर दखल महापौर उदय मडकईकर यांनी घेतली.यापूर्वी तंबी देऊन देखील सुधारणा होत नसल्याने आज सकाळ पासून मनपा कर्मचाऱ्यांनी सगळ्या दुकानदारांची झडती घेऊन त्यांच्याकडील तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले.
त्याच बरोबर सर्व पन्नासही दुकानदारांना त्यांच्या कागदपत्रांसह मनपा कार्यालयात बोलावून त्यांच्या दुकानांना टाळे ठोकण्यात आले.या सर्वांवर कायद्यानुसास दंडात्मक कारवाई केली जाणार असून हमीपत्र घेऊनच पुढची कार्यवाही केली जाईल,असे महापौर मडकईकर यांनी स्पष्ट केले.
ज्यांच्याकडे तंबाखूजन्य पदार्थ सापडले त्यांचे फोटो काढण्यात आले असून त्यांच्याकडून जप्त केलेला माल महापौर मडकईकर यांनी पत्रकार परिषदेवेळी पत्रकारां समोर सादर केला.
यावेळी उपमहापौर वसंत आगशीकर  आणि बाजार समिती अध्यक्ष शेखर डेगवेकर उपस्थित होते.