ड्रग्स माफियांबरोबर किनारी भागातील पोलिस निरीक्षकांचे साटेलोटे:शिवसेनेचा आरोप

0
959
गोवा खबर: गोव्यात उद्या पासून पर्यटन हंगाम सुरु होणार आहे.त्यापूर्वीच हैदराबादच्या युवकाचा हणजूणे येथे झालेला मृत्यू हा राज्याच्या किनारी भागात ड्रग्स माफियांचीच सत्ता चालत असल्याचा पुरावा आहे.याला तेथील पोलिस निरीक्षक जबाबदार असून त्यांच्या तातडीने बदल्या करण्याची गरज आहे.पोलिस आणि ड्रग्स माफियांचे साटेलोटे निर्माण झाले तर ते भविष्यात घातक ठरू शकतील,अशी भीती गोवा शिवसेनेच्या उपाध्यक्ष राखी प्रभुदेसाई नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
        नाईक म्हणाल्या,  स्वच्छ आणि शांत असणाऱ्या राज्याच्या किनारी भागात पर्यटनाच्या नावाखाली अनैतिक प्रकार फोपावले आहेत.  ड्रग्सची विक्री आणि वेश्या वयवसाया सारखे प्रकार वाढू लागले आहेत.ड्रग्सच्या छोटया मोठ्या केसिस करण्या पलीकडे पोलिसांना त्यावर नियंत्रण मिळवण्यात पूर्णपणे अपयश आले आहे. मादक पदार्थांच्या अवैध व्यापारावर कारवाई करून पर्यटकांना ड्रग्समुक्त पर्यटन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळही आहे.मात्र त्याचा वापर होताना दिसत नसल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.
 पर्यटक म्हणून येणार  युवक ड्रगच्या अतिसेवनाने मरत असतील तर विषय गंभीर आहे.ड्रग्सच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात उलाढाल होते.त्याला आळा घालणे पोलिसांचे कर्तव्य असले तरी पोलिस दलातील वाढत चाललेला भ्रष्टाचार त्यात आडकाठी बनत आहे, असा  आरोप नाईक यांनी केला आहे.
 उत्तर गोव्यातील  कळंगुट, हणजूणे, पेडणे आदी पोलिस ठाण्यांमधील काही निरीक्षकांची वर्षानुवर्षे अन्यत्र बदली झालेली नाही.त्यामुळे त्यांची मक्तेदारी चालू आहे. हे का होत आहे, असा सवालही नाईक यांनी उपस्थित केला.
   एखाद्या गैरप्रकाराबद्दल जसे आम्ही एखाद्या मंत्र्याला जबाबदार धरून त्याचा राजीनामा मागतो, त्याचप्रमाणे ड्रग्सच्या अतिसेवनामुळे एखाद्या युवकाच्या मृत्यू सारखी गंभीर घटना घडत असेल तर संबंधित पोलिस निरीक्षकाला जबाबदार धरून त्याला निलंबित केले गेले पाहिजे, अशी मागणी करून नाईक म्हणाल्या, जर एखाद्या पोलिस स्थानकाच्या अधिकारक्षेत्रात गुन्हे अन्वेषण विभागाने मादक पदार्थाचा वा देहविक्रीचा गुन्हा नोंदविला तर स्थानिक पोलिस निरीक्षकाला नोकरीतूनच कमी करायला हवे.
   राज्यात स्वच्छ आणि नैतिक पर्यटनाचाच पुरस्कार शिवसेना करीत आली आहे. आपल्या सुटया शांततेत घालवण्यासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना आमची अजिबात आडकाठी नाही ; पण ड्रग्सच्या रेव्ह पार्ट्या बंद झाल्याच पाहिजेत. झाले ते पुरे झाले, यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा नाईक यांनी दिला आहे.
  नाईक यांनी गोवा फॉरवर्ड पक्षावर देखील हल्ला चढवला.  गोवा फॉरवर्ड पक्षाने शिवोली आणि साळगाव या मतदारसंघांमधे स्थापन केलेल्या तथाकथित ड्रग्स विरोधी पथके नेमकी काय करत आहेत  असा प्रश्न  नाईक यांनी उपस्थित केला. भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या गोवा फॉरवर्ड पक्षाने मोठा गाजावाजा करून ड्रग्स विरोधी पथके स्थापन केली होती. त्यांनी आतापर्यंत किती काम केले आहे, हे जाणून घ्यावयाची आमची इच्छा आहे. शिवोली मतदारसंघात जर असले पथक अस्तित्वात आहे तर मग त्या ठिकाणी ड्रग्सच्या अतिसेवनाने एखाद्या युवकाचा मृत्यू कसा होऊ शकतो, असा सवालही करत त्यांनी गोवा फॉरवर्डला चिमटा काढला आहे.