ड्रग्स प्रकरणी बागा येथून नायजेरियनास अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई

0
1009

गोवाखबर:ड्रग्स व्यवसायात गुंतलेल्या नायजेरियनांचे कंबरडे मोडायचा निर्धार गोवा पोलिसांनी केला असला तरी नायजेरियन ड्रग्स व्यवसाय करताना आढळतच आहेत.कळंगुट पोलिसांनी बागा येथे केलेल्या कारवाईत चरस आणि गांजा बाळगल्या प्रकरणी एका नायजेरियनास अटक केली असून तो व्हिसाची मुदत संपून बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना खात्रीशीर सुत्रांकडून एक नायजेरियन नागरिक बागा येथील टीटोज लेन जवळ ड्रग्स देण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकण्यासाठी एका पथकाची स्थापना केली. दळवी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी बागा येथे सापळा रचला.त्याच दरम्यान संशयीत तेथे ड्रग्स घेऊन दाखल झाला. संशय आल्याने त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करताच दळवी आणि एका पोलिस कॉन्स्टेबलने त्याच्यावर झड़प घालून त्याला पकडले.पकडलेल्या नायजेरियनाचे नाव प्रिन्स इंझेमा असून त्याची झड़ती घेतली असता त्याच्याकडे 1 लाख 35 हजार रूपयांचा चरस आणि गांजा सापडला. ही कारवाई काल रात्री 11 ते मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.ड्रग्स बाळगल्या प्रकरणी प्रिन्सला अमली पदार्थ विरोधी कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे.ही कारवाई पोलिस निरीक्षक दळवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून यात पोलिस उपनिरिक्षक प्रजीत मांद्रेकर पोलिस कॉन्स्टेबल दिनेश मोरजकर,गोविंद शिरोडकर,वल्लभ पेडणेकर आणि बिनोद केरकर सहभागी झाले होते.
प्रिन्स कडे कायदेशीर वास्तव्यासाठी लागणारा पासपोर्ट आणि व्हिसा नसल्याचे आढळून आल्याने त्याच्या विरोधात बेकायदेशीर वास्तव्य केल्या प्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.