ड्रग्स प्रकरणी कळंगुट मध्ये नायजेरीयन ताब्यात

0
946
  1. गोवा खबर:खोब्रावाडो-कळंगुट येथे काल रात्री झालेल्या अपघातामुळे ड्रग्सची विक्री करण्यासाठी आलेला नायजेरियन आयताच कळंगुट पोलिसांच्या हाती सापडला. अपघातात जखमी झालेल्या संशयीत नायजेरीयनावर बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार सुरु असून तेथून डिस्चार्ज मिळताच त्याला अटक केली जाणार आहे.त्याच्या कडून 80 हजार रूपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
    खोब्रावाडो येथे अपघात झाल्याची खबर मिळताच कळंगुट पोलिस घटनास्थळी पोचले तेव्हा अपघाता मध्ये एक नायजेरियन जखमी असल्याचे आढळून आले.पोलिसांना बघताच तो नायजेरियन पळू लागला.काही तरी गडबड आहे याची कल्पना येताच पोलिस निरीक्षक जीवबा दळवी आपल्या टीमसह घटनास्थळावर दाखल झाले आणि त्यांनी त्या नायजेरियनाला पकडून संशय आल्याने त्याची झड़ती घेतली.नायजेरियनाकडील यामाहा स्कूटर मध्ये 80 हजार रूपयांचा गांजा आढळून आला.गुडलक जॉन असे त्या नायजेरियनाचे नाव असून पोलिसांनी त्याची स्कूटर देखील जप्त केली आहे.अमली पदार्थ विरोधी कायद्या अंतर्गत गुडलक विरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सध्या गुडलक वर गोमेकॉ मध्ये उपचार सुरु असून तेथून डिस्चार्ज मिळाला की त्याला अटक केली जाणार असल्याची माहिती दळवी यांनी दिली. या कारवाई मध्ये पोलिस निरीक्षक दळवी यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक विदेश पिळगावकर,कीर्तीदास गावडे, सीताराम मळीक, महेश नाईक पोलिस कॉन्स्टेबल दिनेश मोरजकर,गोविंद शिरोडकर,वल्लभ पेडणेकर आणि प्रवीण चोडणकर सहभागी झाले होते.