ड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त

0
1634
गोवा खबर:गोवा पोलिसांनी शुक्रवारी रात्री दांडोसवाडा-मांद्रे येथे केलेल्या धडक कारवाईत 7 लाख रुपयांचे ड्रग्स बाळगल्या प्रकरणी 4 रशियन नागरीकांना अटक केली. विशेष म्हणजे हे संशयित आपल्या भाडयाच्या फ्लैटमध्ये गांजाची लागवड करत होते.
उत्तर गोवा पोलिस अधीक्षक चंदन चौधरी यांनी दिलेल्या माहिती नुसार पोलिसांनी खात्रीशीर सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार शुक्रवारी 22 फेब्रूवारी रोजी दांडोसवाडो-मांद्रे येथे एका फ्लैटवर धाड टाकली.त्यावेळी त्या भाड्याच्या खोलीत गांजाची लागवड होत असल्याचे पोलिसांना आढळून आले.या प्रकरणी पोलिसांनी रशियन नागरिक इलिया आलेक्झांड्रोविच याला अटक करून त्याचा कडून 608 ग्राम वजनाचा  ६५ हजारांचा गांजा जप्त केला आहे.या प्रकरणी पेडणे पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान ईलियाला पोलिस खाक्या दाखवताच त्याने मांद्रे येथे दुसऱ्या एका फ्लैट मध्ये राहत असलेल्या आणि ड्रग्स व्यवहारात सहभागी असल्या आपल्या सहकाऱ्यांची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तेथे धाड टाकून  रोड्रिक वफीन,एवजनी ज़ाख़रीन आणि लगोर मार्कोवला अटक केली आहे.त्यांच्या कडून 39 ग्राम एक्सटसी टेबलेट्स,4.69 ग्राम एमडीएमए,3.488 किलो गांजा आणि 1.24ग्राम कोकेन जप्त करण्यात आले आहे.चौघांकडून एकूण ७ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. हे चौघे पर्यटन व्हिसावर गोव्यात आले होते.पोलिसांना त्यांचा माग लागल्या पासून ते आपली घरे आणि वाहने सतत बदलत होते.
यातील रॉड्रिकने एटीएम फोडीत सहभागी असल्याची कबूली पोलिस तपासात दिली.  रॉड्रिकने आपल्या सहकाऱ्यां सोबत अनेक एटीएम फोडल्याची कबूली दिली आहे.गॅस कटर आणि स्फोटकांचा वापर करून तो एटीएम फोडत असे. हरमल येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून त्यातील 9 लाख रुपये चोरुन नेण्यात याच टोळीचा हात होता.रॉड्रिकने दिलेल्या माहितीनुसार मांद्रे येथून GA 03-W5666 नंबरच्या निळया रंगाची मारुती सुझुकि कार आणि  काळया रंगाची नंबर नसलेली यामाहा बाइक  पोलिसांनी  जप्त केली आहे.ही दोन्ही वाहने संशयीत एटीएम चोरीसाठी वापरत असल्याची माहिती पुढे आली आहे.एटीएम फोड़ीसाठी लागणारी हत्यारे संशयितांनी कार मध्ये लपवून ठेवली होती.
ही धाडसी कारवाई पेडणेचे पोलिस निरिक्षक संदेश चोडणकर,पोलिस उपनिरिक्षक अनंत गावकर,सागर धाटकर,प्रफुल्ल गिरी,पराग पारेख यांनी म्हापशाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सेराफिन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली केली. यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल स्वप्निल शिरोडकर,रूपेश कोरगावकर,अनंत भाईडकर,लक्ष्मण नाईक, सदाशिव परब, आशीष परब,देवीदास माळकर,गुरुदास मांद्रेकर,निखिल गावस,विनोद पेडणेकर,शैलेश पार्सेकर, किरण परब, महिला पोलिस कॉन्स्टेबल स्वाती हळर्णकर,दिपा विरोडकर यांनी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक चंदन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेतला होता.