ड्रग्सच्या पार्श्वभूमीमुळे सनबर्नची  मान्यता रद्द करा:हिंदू जनजागृती समितीची मागणी

0
1022
गोवा खबर: गोमंतकीयांच्या वाढत्या विरोधामुळे, तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाच्या आदेशानुसार ‘सनबर्न’ महोत्सवाला गोव्यातून ३ वर्षांपूर्वी हद्दपार व्हावे लागले होते. यंदा ‘सनबर्न’चे आयोजक ‘पर्सेप्ट लाईव्ह’ हे गोव्यातील ‘क्लासिक ईव्हेंट्स’ या संस्थेच्या सहयोगाने २३ आणि २४ फेब्रुवारी या कालावधीत वागातोर येथे ‘सनबर्न क्लासिक’ या ‘इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टीव्हल’चे (ईडीएम्) आयोजन करणार आहे. ‘सनबर्न क्लासिक’ला सरकारने दिलेली मान्यता त्वरित रद्द करावी.

सनबर्न’ने बुडवलेला कर व्याजासह त्वरित वसूल करावा. राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्‍या ‘सनबर्न फेस्टिव्हल’ आयोजकांवर ध्वजसंहितेनुसार गुन्हा दाखल करावा. युवा पिढीला व्यसनाधीन बनवणारे आणि पाश्‍चात्त्य विकृतीचे उदात्तीकरण करणार्‍या ईडीएम्ना गोव्यात परवानगी देऊ नये. गोवा ईडीएममुक्त करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केली. यावेळी रणरागिणीच्या राजश्री गडेकर, शिवसेनेचे माजी गोवा राज्यप्रमुख  रमेश नाईक यांचीही उपस्थिती होती.
डॉ. सोलंकी म्हणाले,‘गोव्यात होणार्‍या ‘सनबर्न’ फेस्टिव्हलची पार्श्‍वभूमी वादग्रस्त आहे. ‘सनबर्न’ फेस्टिव्हल मध्ये सौरभ अगरवाल नावाच्या ड्रग डिलरला चरससहित अटक होणे, ‘ड्रग्ज-फ्री इव्हेंट आहे’, असे आयोजकांनी सांगूनही महोत्सवस्थळी ड्रग्सच्या सेवनाचा मुक्त संचार असणे, फेस्टिव्हलमध्ये  २००९ ला नेहा बहुगुणा हिचा, तर  २०१४ मध्ये ‘सुपरसोनिक’ फेस्टिव्हलमध्ये ईशा मंत्री या युवतीचा ड्रग्सच्या अतीसेवनामुळे मृत्यू होणे, सरकारचा कोट्यवधी रुपयांचा कर न भरणे, असे प्रकार घडले आहेत,याची गंभीर दखल घेतली जावी.
 पुणे येथेही ‘सनबर्न’ फेस्टिव्हलची कायदाद्रोही पार्श्‍वभूमी आहे. ‘सनबर्न’ फेस्टिव्हलने केसनंद गावाचा दारूबंदीचा ठराव ‘दारूचे स्टॉल’ उभारून मोडीत काढणे, फेस्टिव्हलमध्ये आयोजकांनी अवैधरित्या उत्खनन करणे, वृक्षतोड करणे, तिकीटविक्री लपवून ठेवून सरकारचा कर बुडवणे, ध्वनीप्रदूषण करणे, स्वतःच्या लाभासाठी राष्ट्रध्वजाचा वापर करून तिरंग्याला विकृत स्वरूपात प्रदर्शित करणे’, आदी घटना घडल्या आहेत, याकडे लक्ष वेधुन सोलंकी यांनी अशा महोत्सवाला मान्यता देऊन गोव्याची युवा पिढी व्यसनाधीन झालेली आणि पाश्‍चात्त्य विकृतीच्या आहारी गेलेली सरकारला चालते का,असा प्रश्न उपस्थित केला.
 ‘सनबर्न क्लासिक’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे,अशी टिका  सोलंकी यांनी केली.
  गोवा सरकारने सध्या समुद्रकिनार्‍यावर आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करण्यास बंदी घालण्याचा एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. सरकार स्वतःचाच बंदी आदेश मोडून महोत्सवात मद्यविक्रीस परवानगी देणार का ? ‘बुडवलेला कर भरल्याशिवाय ‘सनबर्न’ला गोव्यात प्रवेश देणार नाही’, असे म्हणणार्‍या सरकारने अचानकपणे‘सनबर्न क्लासिक’ला मान्यता देण्यामागील कारण सरकार घोषित करणार का ? बुडवलेला कर शासकीय तिजोरीत जमा होणार, याची सरकार हमी देऊ शकते का ? आदि प्रश्न सोलंकी यांनी उपस्थित केले.
 समितीने या विषयीचे निवेदन मुख्यमंत्री, पर्यटनमंत्री, उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस महासंचालक यांना दिले असून पणजीतील आझाद मैदानावर 10 रोजी सनबर्न विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.