ड्रग्सचे जाळे उध्वस्त करा:मुख्यमंत्र्यांचा आदेश

0
1028

ड्रग्सच्या अतीसेवनाने 2 पर्यटकांचा झालेला मृत्यू आणि एका हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येची सुपारी घेतलेल्या शार्फ शूटरना झालेल्या अटके नंतर गोव्यातील राजकारण तापू लागले आहे.आज मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी याची गंभीर दखल घेत ड्रग्स व्यवसायाची पाळेमुळे खणून काढा असे स्पष्ट आदेश पोलिसांना दिले आहेत.मुख्यमंत्र्यांनी आज वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांबरोबर किनारी भागातील पोलिस निरिक्षकांची बैठक घेऊन ड्रग्स वाढते लोण कदापि खपवून घेणार नाही असे स्पष्ट करत कडक पावले उचलून ड्रग्सची किड ठेचुन काढ़ा असे निर्देश पर्रिकर यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिले. जे रेस्टॉरंट चालक यात गुंतले असल्याचे आढळतील त्यांची गय करू नका थेट कारवाई करून ही किड ठेचा असे पर्रिकर यांनी आदेश दिल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

राज्यातील कायदा सुव्यस्था बिघडली-काँग्रेस

दरम्यान आज दुपारी काँग्रेसने भाजप आघडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मनोहर पर्रिकर यांना कायदा आणि सुव्यवस्था सांभाळता येत नाही.ड्रग्स,वेश्या व्यवसाय आणि गुंडागिरी वाढली असून लोकांचे जगणे मुश्किल झाल्याचा आरोप आमदार आलेक्स रेजिनाल्ड,यतीश नाईक, जोसेफ सिक्वेरा, यांनी केला. उपसभापती मायकल लोबो आपल्याकडे गुन्हेगारांशी संधान साधून असलेल्या पोलिसांची यादी असल्याचा दावा करतात त्यांना जर खरोखरच यातून जनतेचे भले हवे असेल तर त्यांनी ती नावे जाहिर करावी असे रेजिनाल्ड म्हणाले.

ड्रग्स व्यवसायाला पोलिसांचा आशीर्वाद-सरदेसाईं
विरोधकांच्या आक्रमकतेला गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांच्या खळबळ जनक विधानाने बळ मिळाले. ड्रग्सचा व्यवसाय पोलिसांच्या पाठबळाशीवाय फैलावू शकत नाही. काही भ्रष्ट पोलिसांच्या आशीर्वादामुळे ड्रग्स व्यवसाय वाढला असून आपल्या सरकारने याची गंभीर दखल घेतली असून या व्यवसायाचे कंबरडे मोडून काढले जाईल असे ट्विट सरदेसाई यांनी केले आहे.

ड्रग्स विरोधात कारवाई सुरु
पोलिसांनी ड्रग्स व्यवसायाविरोधात फास आवळण्यास सुरवात केली आहे.हणजुणे पोलिसांनी पेडणे येथील मंजूनाथ अनवेरिकर या युवकाला अटक करून त्याच्या कडून 7.3ग्रामचे 8 हजार रूपयांचे ड्रग्स जप्त केले आहे.
याशिवाय हणजुणे पोलिसांनी आज पहाटे बंगळूरु येथील 3 युवकांकडून 7.7ग्रामचा चरस जप्त केला आहे.आकाश प्रसाद,मोरिको मुल्लेन, डेरीस सारीगाला या 19 वर्षाच्या युवकांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.