डॉ. काशीनाथ जल्मी अभ्यासू व्यक्तिमत्व

0
47
आज स्व. डॉ. काशिनाथजल्मी यांची ७१वी जयंती. दोनवेळा कुंभारजुवे व एकदा प्रियोळ मतदारसंघाचे त्यांनी गोवा विधानसभेत प्रतिनिधित्व केले. एसटी (गौड मराठा) समाजात यांचा जन्म झाला. घरात गरीबी. अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन ते त्याकाळी डॉक्टर झाले. प्रियोळ मतदारसंघातील खांडोळा गावातील तामसुली हे माझे मूळ गाव. त्यामुळे व सामाजिक कार्याच्या निमित्ताने डॉ. जल्मी यांच्याशी संबंध यायचा. डॉ. जल्मी यांचा राष्ट्र सेवा दलाशी संबंध आल्यामुळे ते समाजवादी विचारांशी जोडले गेले. माशेल गावात त्यांची वैद्यकीय प्रॅक्टिस ही चांगली होती.
माशेल ग्रामपंचायतीचे सरपंच व मग आमदार हा त्यांचा राजकीय प्रवास. डॉ. जल्मी हे अभ्यासू व प्रत्येक गोष्टीच्या खोलात जाऊन ती समजून घेणे हे त्यांचे वैशिष्टय. त्यांचे वाचनही अफाट. दवाखान्यात त्यांच्या आजूबाजूला पुस्तके असायचीच. त्यांचा आवाज काहीसा चिरका. त्यात ते मोठ्याने बोलू लागले कि किंचाळल्यासारखे वाटायचे. कायद्याचा सखोल अभ्यास व त्याची चिरफाड करत बोलणे ही त्यांच्या भाषणाचे वैशिष्ट्य. अनेकवेळा गोवा विधानसभेचे अधिवेशन पाहण्यासाठी मी त्यांचा पास घेऊन जात असे. त्यावेळची त्यांची विधानसभेतील भाषणे अजूनही आठवतात. १९९० साली ज्यावेळी डॉ. बार्बोझा यांच्या नेतृत्वाखाली सरकार घडले त्यावेळी सम्राट हॉटेलच्या बाहेर त्यांची भेट झाली.
‘आता आमी गव्हर्नराक मेळूक वता. चल या.’ असं म्हणून मी व माझे दोन मित्र त्यांच्याबरोबर गाडीत बसून राजभवनात गेलो. तेव्हा पहिल्यांदा मी गोवा राजभवन पहिले. सरकार घडवण्याच्या प्रक्रियेसाठी त्यावेळी केंद्रीय मंत्री स्व. जॉर्ज फर्नांडिस आले होते. त्याचवेळी त्यांनाही पहिल्यांदा पाहण्याचे भाग्य लाभले. १९८९ साली स्व. डॉ. बार्बोझा हे सभापती होते. त्यांच्या नेतृत्वाखाली काही काँग्रेस आमदारांनी बंड केले व मगो पक्षासोबत प्रागतिक विकास आघाडी (PDF) ची  स्थापना केली.
डॉ. बार्बोझा सभापती असल्याने कायदेशीर बाबी होण्यासाठी काहीवेळ आवश्यक होता. म्हणून अवघ्या १५ दिवसांकारिता
चर्चील आलेमाव मुख्यमंत्री झाले. नंतर सभापती पदाचा राजीनामा देऊन डॉ. बार्बोझा मुख्यमंत्री झाले. त्या मंत्रिमंडळात डॉ. जल्मी आरोग्यमंत्री होते. काहीकाळाने पक्षांतरविरोधी मुद्दे उपस्थित झाले. त्यात सभापती पक्षांतर करू शकतो का असाही मुद्दा होता. त्यावेळी १९९० मध्ये डॉ. जल्मी यांनी सभापती हा पक्षांतर करू शकत नाही असा ऐतिहासिक निर्णय दिला. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने देखील हा निवाडा उचलून धरला.
१९९२-९३ साली केरी पठारावर नायलॉन ६६ हा प्रकल्प होऊ घातला होता. प्रदूषणाच्या मुद्द्यावर या प्रकल्पाच्या विरोधात केरी व शेजारील सर्व गावे पेटली होती. पाहता पाहता अख्या गोव्यात हा विषय पोचला. पण डॉ. जल्मी ठामपणे या प्रकल्पाच्या बाजूने उभे राहिले. तो कसा प्रदूषणकारी नाही हे आपल्या लेखातून व भाषणातून मांडत होते. जनता विरोधात व त्यांचा प्रतिनिधी समर्थनार्थ असे काहीसे विचित्र चित्र होते. मला आठवते कि माशेल मधील पंचायत हॉल मध्ये या प्रकल्पविरोधात सभा होती. सगळे वक्ते पोटतिडकीने प्रकल्पाच्या व डॉ. जल्मी यांच्या विरोधात बोलत होते.
डॉ. जल्मी यांनी सदर पंचायत इमारतीसमोर उभे राहून संपूर्ण सभा शांतपणे ऐकली. त्यानंतर काही दिवसांनी डॉ. अनिल देसाई व डॉ. जल्मी यांची त्या प्रकल्पाचे तंत्रज्ञान व प्रदूषण याविषयावर माशेल मध्ये जाहीर चर्चा झाली. त्यावेळी डॉ. जल्मी यांनी त्या प्रकल्पाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विषयक बाबींचा किती तपशीलवार व गंभीरपणे अभ्यास केला होता हे चर्चेच्यावेळी दिसून आले. त्यांचे ते समर्थन हे डोळस व अभ्यासू होते.
मात्र शेवटी सरकारला तो प्रकल्प गुंडाळावा लागला. १९९४ साली या विरोधाच्या पार्श्वभूमीवर  झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोहन वेरेकर हे प्रकल्प-विरोधकांचे उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे राहिले. डॉ. जल्मी ती निवडणूक जिंकले पण तो त्यांचा शेवटचा विजय ठरला. कारण १९९९ सालच्या निवडणुकीत ऍड. विश्वास सतरकर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला व त्यांनतर ते पुन्हा कधीही निवडून आले नाहीत. मला आठवते १९९८ साली डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली भाजपा व मगो समर्थित सरकार काहीकाळ घडले. त्यावेळी पणजीच्या हॉटेल राजधानीतून सर्व राजकीय घडामोडी चालू होत्या. त्यावेळचे राज्यपाल जेकब यांना पत्र द्यायचे होते.
डॉ. जल्मी यांनी भारतीय घटना व विधानसभेचे नियम यांचा उल्लेख व संदर्भ देत एकहाती पत्र लिहिले. हे लिहिताना ना घटनेचे ना नियमांचे पुस्तक त्यांच्यासोबत होते. पंच, सरपंच, मंत्री, विरोधीपक्षनेता यापेक्षाही एक कायदेतज्ञ म्हणूनच डॉ. जल्मी यांची ओळख होती. यावर्षी २२ जुलै रोजी त्यांची ९वी पुण्यतिथी. अवघे ६२ वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. त्यांना आदरांजली!
– नरेंद सावईकर