डिसेंबरमध्ये वरुणापुरी–सडा उड्डान पूल वाहतूकीस खुला : मुख्यमंत्री

0
180

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज बायणा वास्को येथील चौपदरी राष्ट्रीय महामार्ग १७ ब प्रकल्पाचा आढावा घेत वरुणापुरी ते सडा जंक्शन (५.३.  किमी) विभाग १९ डिसेंबर २०२१ ला वाहतुकीसाठी खुला केला जाईल असे जाहीर केले.

मुख्यमंत्री डॉ.सावंत यांनी आज या प्रकल्पातील सर्व संबंधितांची बैठक घेतली आणि त्यांनी कंपनी गॅमन इंडियाच्या कंत्राटदाराला कामाला गती देऊन सदर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. मुख्यत्र्यांनी मुख्य भाग तयार असल्याने हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यात यावा असे सांगितले आणि मुख्य भाग डिसेंबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा असे ते म्हणाले.

नगरविकास मंत्री श्री मिलिंद नाईक, मुख्य सचिव, श्री परिमल राय, आयएएस, पीडब्ल्यूडीचे प्रधान मुख्य अभियंता यु. पार्सेकर व अन्य अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

गॅमन इंडियाचे उपाध्यक्ष श्री. अनंत कडीवाल यांनी या प्रकल्पांतर्गत मुख्य भागातील पूर्ण झालेल्या विविध कामांची माहिती दिली.

वरुणापुरी ते सडा जंक्शन उड्डाण पुलाच्या जागेची पाहणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांना प्रकल्पासाठी हाती घेतलेल्या कामांच्या विविध बाबींची माहिती देण्यात आली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी वरुणापुरी ते सडा जंक्शन उड्डाण पूल हे एनएच १७ बी प्रकल्पाच्या चौपदरीकरणाचे मुख्य कार्यक्षेत्र असून याचे काम पूर्ण झाल्यानंतर वास्को शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविल असे सांगितले. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी दूर होण्याबरोबरच सुरळीत वाहतूकीसही मदत होईल असे ते म्हणाले.

पीडब्ल्यूडीने मुरगांव पोर्ट ट्रस्टच्या सहकार्याने हा प्रकल्प सुरू केला आहे. ऑक्टोबर २०१५ मध्ये याची सुरुवात झाली. प्रकल्पाचा अंदाजे खर्च रूपये ५०० कोटी एवढा आहे.

सुरवातीस मुख्यमंत्र्यांनी मंत्री मिलिंद नाईक यांच्याबरोबर सुमारे ८ कि.मी. लांबीच्या रस्ता बांधकाम प्रकल्पासंदर्भात बैठक घेतली आणि प्रगतीचा आढावा घेतला. या प्रकल्पात बायणा ते सडा जंक्शन आणि सडा जंक्शन ते अंटार्क्टिका केंद्र या रस्त्यांचा समावेश आहे.

मंत्री मिलिंद नाईक यांनी हा रस्ता निर्धारित वेळेत पूर्ण न केल्याबद्दल कळवळा व्यक्त केला. या रस्ता बांधकामातील अनेक पैलू अपूर्ण असून लोकांचा त्रास कमी करण्यासाठी लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. मुख्यमंत्र्यांनी संबंधित कंत्राटदारांना या कामास गती देऊन रस्त्याचे काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले.