डाॅ.अनुजा जोशी यांना मसापचा “कविवर्य ना.घ.देशपांडे विशेष ग्रंथकार पुरस्कार” जाहीर

0
963

गोवा खबर:महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे या नामांकित संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त विविध वाड्.मय पुरस्कार प्रदान केले जातात. उत्कृष्ट ग्रंथ व प्रतिभासंपन्न ग्रंथकारांना त्यांच्या वाड्.मय क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरविले जाते.

यावर्षी गोव्याच्या प्रतिभाशाली कवयित्री डाॅ.अनुजा जोशी यांना *मसापचा “कविवर्य ना.घ. देशपांडे विशेष ग्रंथकार पुरस्कार  जाहीर झाला आहे.
 अनुजा जोशी यांचे “उत्सव” व “उन्हाचे घुमट खांद्यावर” हे दोन्ही कवितासंग्रह वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण कवितांमुळे बहुचर्चित झाले असून एकूणच मराठीतील स्त्रीवादी कवितेत लक्षणीय ठरले आहेत. या महत्वपूर्ण योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे.
मसापचे प्रमाणपत्र व रु.११०० असे या पुरस्काराचे स्वरुप असून २६ मे रोजी पुणे येथे होणा-या मसापच्या वर्धापनदिन समारंभामधे ज्ञानपीठ विजेत्या उडिया साहित्यिक प्रतिभा राॅय व ज्येष्ठ विचारवंत,साहित्यिक डाॅ.रावसाहेब कसबे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
मराठी साहित्यातील अत्यंत मानाचा समजला जाणारा मसापचा हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गोमंतकीय साहित्यक्षेत्रातूनही डाॅ. जोशी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.