‘ट्रिपल तलाक’वर सहा महिने बंदी

0
932

‘ट्रिपल तलाक’ प्रथेवर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. मुस्लिम समाजातील महिलांसाठी अन्यायकारक असलेली ही प्रथा घटनाबाह्य ठरवत न्यायालयानं केंद्र सरकारला याबाबत कायदा करण्याचे आदेश दिले आहेत. तोपर्यंत ही प्रथा बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.मुस्लिम महिलांना देण्यात येणारा तोंडी तलाक हा घटनाबाह्य असल्याचा आरोप करत शायरा बानो या  महिलेने याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुस्लिमांमधील या प्रथेचा दुरुपयोग करीत काहीजण एकाचवेळी तीनवेळा तलाक शब्द उच्चारून बायकांना घटस्फोट देतात. तर, काहीजण फोनद्वारे वा एसएमएसद्वारेही तलाक देतात, याकडे  लक्ष वेधले होते.सरन्यायाधीश जे. एस. केहर यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठानं आज या प्रकरणी निकाल दिला. या घटनापीठामध्ये न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, आर. एफ. नरिमन, यू. यू. ललित आणि एस. अब्दुल नझीर यांचा समावेश होता. यापैकी न्या. कुरियन, नरिमन व ललित यांनी ट्रिपल तलाक घटनाबाह्य ठरविण्याच्या बाजूनं मत दिलं. तर, सरन्यायाधीश जगदीश केहर व न्या. नझीर यांनी त्याउलट मत मांडलं. अखेर ३ विरुद्ध २ मतांनी ही प्रथा घटनाबाह्य असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.