टीम इंडियाच्या महागुरूपदी रवी शास्त्रीच!

0
1198

गोवा खबर:टीम इंडियाच्या महागुरू अर्थात  प्रशिक्षकपदी रवी शास्त्रीच यांची पुन्हा निवड झाली आहे.माजी  क्रिकेट कप्तान कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील समितीने शास्त्री यांच्या नावावर पुन्हा शिक्कामोर्तब केले आहे.


भारतीय क्रिकेट संघ सध्या विंडीज दौर्‍यावर आहे. संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी दोन हजारांहून अधिक अर्ज आले.  सर्व उमेदवारांनी कपिलदेव यांच्या अध्यक्षतेखालील सल्लागार समितीसमोर आपले प्रेझेंटेशन दिले. या समितीमध्ये कपिलदेव यांच्याशिवाय अंशुमन गायकवाड व शांता रंगास्वामी यांचाही समावेश होता.

वेस्ट इंडिजला रवाना होण्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीने संघाच्या प्रशिक्षकपदीरवी शास्त्रीच मिळाले तर संघाला चांगले वाटेल, असे म्हटले होते. त्यामुळे विराटची भविष्यवाणी खरी ठरली आहे. रवी शास्त्रींचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे.

 

शास्त्री जुलै २०१७पासून टीम इंडियाचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात टीम इंडियाने आतापर्यंत १३ कसोटी सामने जिंकले आहेत. तर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ३६ पैकी २५ सामने जिंकले आहेत. तर एकदिवसीय मालिकेत ६० पैकी ४३ सामने जिंकले आहेत.

शास्त्रींची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. २०२१मध्ये होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपपर्यंत ते प्रशिक्षकपदी राहणार आहेत.

प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रॉबिन सिंग, माइक हेसन, लालचंद राजपूत, फिल सिमन्स, टॉम मुडीही होते. सिमन्सने आजच या स्पर्धेतून आपलं नाव मागे घेतलं होतं.